PayPal Layoffs India news: अमेरिकन फिनटेक कंपनी पेपल होल्डिंग्सने (PayPal Holdings) भारतातील विविध विभागांमधील सुमारे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामुळे चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील कार्यालयांमध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, ऑपरेशन्स, पेमेंट्स आणि वित्त यांसारख्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी ही माहिती दिल्याचे वृत्त मनीकंट्रोल संकेतस्थाने दिले आहे.

“याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. सोमवारी सकाळी (३१ ऑगस्ट) आम्हाला एका कॉलमध्ये सहभागी होण्यास सांगितले. त्यात भारतातील विविध कार्यालयांमधील अनेक कर्मचारी होते. आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला कामावरून कमी केले जात आहे. त्या कॉलच्या अगदी मिनिटांनंतरच, आमचा सिस्टीम ॲक्सेस त्वरित काढून घेण्यात आला”, असे एका बाधित कर्मचाऱ्याने सांगितले.

तो कर्मचारी पुढे म्हणाला, “त्यानंतर आम्हाला केवळ पुढील प्रक्रियेची माहिती देणारा ‘ऑफ-बोर्डिंग’ ईमेल मिळाला. आम्हाला नवी नोकरी शोधण्यासाठी मदत केली जाणार आहे आणि ‘सेव्हरन्स पे’ म्हणून एका महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, त्याबाबत तसेच ‘फुल अँड फायनल सेटलमेंट’बाबत आम्हाला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.”

पेपलमधील पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर भारतात ही कर्मचारी कपात करण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, पेपलने जागतिक स्तरावर २० टक्के कर्मचारी कपात करण्याच्या उद्देशाने एक योजना आखल्याचे वृत्त आले होते. ३१ डिसेंबर २०२५ रोजी पेपलकडे जगभरात सुमारे २३,८०० कर्मचारी होते. याचा अर्थ या कपातीचा फटका सुमारे ४,७६० कर्मचाऱ्यांना बसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेपल टप्प्याटप्प्याने ही कर्मचारी कपात करत आहे. याची सुरुवात भारत आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रापासून झाली असून, त्यानंतर सोमवारपासून अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका येथील संबंधित कर्मचाऱ्यांशी बैठका घेतल्या जात आहेत.

सर्वच क्षेत्रात नोकरकपात

अलिकडील काळात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणारी पेपल ही एकमेव कंपनी नाही. बुधवारी उबरने जागतिक स्तरावर ३,३०० कर्मचाऱ्यांना कपात करण्याची योजना जाहीर केली. यातून होणारी बचत ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स’सारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवली जाणार आहे. ओरेकल देखील लवकरच सुमारे १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू शकते, विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी जागतिक स्तरावर ३२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

‘लेऑफ्स.एफवायआय’ (layoffs.fyi) च्या आकडेवारीनुसार, केवळ या वर्षात जागतिक स्तरावर १,२८,००० हून अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. गेल्या संपूर्ण वर्षात झालेल्या १,२२,००० नोकऱ्यांच्या कपातीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे.