UPI Safety Tips : यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेसमुळे डिजिटल व्यवहार अत्यंत जलद आणि सोपे झाले आहेत. आज भाजीबाजारापासून शेअर बाजारापर्यंत लाखो आर्थिक व्यवहार यूपीआयद्वारे होत आहेत. मात्र, दुसरीकडे सायबर गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. बनावट पेमेंट रिक्वेस्टपासून ते फेक लिंक्स आणि रिमोट ॲक्सेस स्कॅमपर्यंतचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर, लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘फोनपे’ने युजर्सना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तीन महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स दिल्या आहेत.
१. पैसे मिळवण्यासाठी करण्यासाठी कधीही यूपीआय पिन टाकू नका
बँक खात्यातून पैसे पाठवण्यासाठी यूपीआय पिनची आवश्यकता असते, पण कोणाकडूनतरी पैसे मिळवण्यासाठी कधीही यूपीआय पिन टाकावा लागत नाही. सायबर भामटे तुम्हाला पैसे किंवा रिफंड द्यायचा म्हणून खोट्या पेमेंट रिक्वेस्ट किंवा क्यूआर कोड पाठवतात. हे पैसे मिळवण्यासाठी पिन टाकण्याची विनंती केली जाते. अशा पेमेंट रिक्वेस्टवर पिन टाकला तर तुमच्या खात्यातून पैसे चोरी केले जाता. जर एखाद्या व्यवहारादरम्यान तुम्हाला यूपीआय पिन टाकण्यास सांगितले गेले, तर सावध व्हा.
२. पैसे पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव तपासा
कोणताही यूपीआय व्यवहार पूर्ण करण्यापूर्वी, पेमेंट स्क्रीनवर दिसणारे नोंदणीकृत बँक खातेधारकाचे नाव आवर्जून तपासा. स्कॅमर मित्र, कुटुंबीय किंवा व्यावसायिकांच्या नावाने बनावट प्रोफाइल असलेल्या यूपीआय आयडीचा वापर करू शकतात. तुम्हाला संशयास्पद नाव आढळले, तर व्यवहार त्वरित थांबवा. रोख पैशांच्या बदल्यात डिजिटल पैसे देण्याची ऑफर देणाऱ्या अज्ञात व्यक्तींपासून दूर राहा, अशी ऑफर फसवणुकीचा भाग असू शकते.
३. कधीही ओटीपी शेअर करू नका किंवा अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
सायबर गुन्हेगार अनेकदा बँक अधिकारी, टेलिकॉम प्रतिनिधी किंवा कस्टमर सपोर्ट एजंट असल्याचे भासवून युजर्सना फसवतात. फोन, मेसेज किंवा ईमेलवर कधीही तुमचा ओटीपी, यूपीआय पिन किंवा बँकिंग तपशील शेअर करू नका. अज्ञात कॉलरच्या सांगण्यावरून कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा स्क्रीन-शेयरिंग ॲप्स इन्स्टॉल करू नका. अशा ॲप्समुळे स्कॅमर्सना तुमच्या फोनचा ताबा मिळतो आणि गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
यूपीआय फसवणूक झाल्यास काय करावे?
- फसवणूक झाल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर त्वरित कॉल करुन तक्रार नोंदवा.
- https://www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार कराल, तितके पैसे गोठवले जाण्याची शक्यता जास्त असते.
- ज्या बँकेच्या खात्यातून पैसे गेले आहेत, त्या बँकेच्या कस्टमर केअरशी किंवा बँकेशी त्वरित संपर्क साधून व्यवहाराची माहिती द्या.
