PhysicsWallah AI tutor : सध्या बहुतेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयचा बोलबाला सुरू आहे. गुगल, मेटासारख्या जगातील दिग्गज कंपन्या यात आघाडीवर आहे. मात्र, आता शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा बदल घडवून आणण्यासाठी भारतीय एडटेक कंपनी ‘फिजिक्सवाला’ सज्ज झाली आहे. कंपनी याच वर्षाच्या अखेरीस स्वतःचा ‘एआय ट्युटर’ लाँच करणार आहे. विशेष म्हणजे, ओपनएआय, गुगल आणि अँथ्रॉपिक सारख्या जागतिक एआय दिग्गजांकडे जे नाही, ते आपल्याकडे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतातील लाखो विद्यार्थ्यांचा डेटा आणि त्यांच्या अभ्यासाची पद्धत या बळावर फिजिक्सवाला जागतिक कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘हायपर-पर्सनलाइज्ड’ एआय ट्युटर

फिजिक्सवाला ही ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण घेणारी अग्रगण्य एडटेक कंपनी आहे. फिजिक्सवालाचे सहसंस्थापक प्रतीक माहेश्वरी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, शिक्षणाचे भविष्य हे ‘वन-टू-वन’ (एक विद्यार्थी-एक शिक्षक) ट्युटरिंगमध्ये आहे. याच धर्तीवर आम्ही काम करत असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तीक मार्गदर्शन करणारे एआय ट्युटर तयार करत असून या वर्षातच तो बाजारात आणला जाईल.

फिजिक्सवाला कशाच्या बळावर जागतिक कंपन्यांना टक्कर देणार?

एआय विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा कच्चा माल हा डेटा आहे. आणि हीच फिजिक्सवालाची सर्वात मोठी शक्ती असल्याचा कंपनीचा दावा आहे. फिजिक्सवालाच्या प्लॅटफॉर्मवर सध्या १३.५ कोटींहून अधिक मोफत शिकणारे विद्यार्थी आहेत, तर दररोज ३५ लाख सक्रिय विद्यार्थी सरासरी दोन तास या प्लॅटफॉर्मवर घालवतात. याद्वारे दररोज अब्जावधी डेटा पॉइंट्स तयार होतात. भारतातील परीक्षा पद्धती आणि प्रश्नोत्तरांचा हा प्रचंड डेटा केवळ फिजिक्सवालाकडे असल्याने, गुगल किंवा ओपनएआयने स्वतंत्र शैक्षणिक उत्पादन आणले तरी ते भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुसंगत असण्याची शक्यता खूप कमी आहे.

रेकॉर्डेड व्हिडिओ इतिहासजमा होणार?

आतापर्यंत ऑनलाईन शिक्षणाची मदार ही ‘रेकॉर्डेड व्हिडिओ’वरच आहे. मात्र, आकडेवारीनुसार रेकॉर्ड केलेल्या कोर्सेसचा पूर्ण होण्याचा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणजे हे मॉडेल यशस्वी झाले असं म्हणता येणार नाही. एआयमुळे यात क्रांतीकारी बदल बोणार आहे. कारण, संभाषणात्मक एआय ट्युटरमुळे हा दर थेट ६० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शिकण्याचे निकाल २० ते ३० पटीने सुधारतील.

‘एआय गुरू’ची यशस्वी घोडदौड

यापूर्वीच कंपनीने ‘एआय गुरू’ हे टूल लाँच केलं असून याला मोठी पसंती मिळाली आहे. अवघ्या एका महिन्यात या टूलने १० कोटींहून अधिक प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत. तर २० लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले आहे. ३० लाखांहून अधिक व्हॉईस क्वेरी हाताळल्या आहेत.

१००% अचूकतेसाठी मानवी पडताळणी

विद्यार्थ्यांचे ९० टक्के प्रश्न सध्या एआयद्वारे सोडवले जात असले, तरी शैक्षणिक विश्वासार्हतेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा एखादा विद्यार्थी उत्तराला ‘थंब्स-डाऊन’ (नकारात्मक रेटिंग) देतो, तेव्हा तो प्रश्न थेट मानवी तज्ज्ञांकडे वर्ग केला जातो. एआय प्लॅटफॉर्म ९०% अचूक असला तरी संस्था म्हणून १००% अचूकतेची हमी देणे आवश्यक असल्याचे माहेश्वरी यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांची नोकरी जाणार?

एआय ट्युटरच्या आगमनानंतरही शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. अध्यापन हे एक कौशल्य आहे. भविष्यात शिक्षक स्वतःच्या शिकवण्याच्या पद्धतीवर आधारित ‘एआय एजंट’ तयार करतील, जे त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे वैयक्तिक शिकवणी वर्ग घेतील. तसेच, एआय कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह ठेवत नसल्याने, लहान मुले कितीही वेळा आणि अगदी सोपे प्रश्नही न घाबरता एआयला विचारू शकतात.

फिजिक्सवालाच्या नफ्यात मोठी वाढ

फिजिक्सवालाचा वार्षिक महसूल ५१ टक्क्यांच्या वाढीसह ३,८९९.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर वार्षिक तोटा ९० टक्क्यांनी घटून अवघा २४.३ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला आहे. विशेष म्हणजे, ही सुधारणा सध्या एआय उत्पादनांमुळे नसून कंपनीच्या मूळ व्यवसायाच्या वाढीमुळे झाली आहे.