Raghuram Rajan debunks the immediate threat of AI replacing all office workers by 2028: कृत्रिम बुद्धिमत्तेत (एआय) प्रगती होत असताना मानवी कर्मचाऱ्यांची जागा मशीन्स घेतील अशी भीती वेगाने पसरत आहे. सिट्रिनी या संशोधन संस्थेने अलीकडेच व्यक्त केलेल्या अंदाजात असे म्हटले आहे की, २०२८ पर्यंत एआय बहुतेक ‘व्हाईट कॉलर’ नोकऱ्यांची जागा घेऊ शकते.
जी कामे प्रामुख्याने कार्यालयांमध्ये बसून, कागदपत्रांशी संबंधित आणि संगणकावर केली जातात, त्यांना ‘व्हाईट कॉलर जॉब’ म्हटले जाते.
परंतु प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते, हे कदाचित इतके सोपे नसेल. राजन यांचे असे म्हणणे आहे की हा अंदाज काही अंशी अतिशयोक्तीपूर्ण आहे. तरीही काही बाबतीत एआयमुळे अर्थव्यवस्थेला निर्माण होणाऱ्या सखोल धोक्यांकडे कदाचित दुर्लक्षही केले जात आहे.
रघुराम राजन यांनी “आर वी फेसिंग एआय नाईटमेअर” या त्यांच्या लेखात म्हटले आहे की, तंत्रज्ञानातील बदल क्वचितच लोकांना भीती वाटते तितक्या लवकर होतात. तंत्रज्ञान अस्तित्वात असतानाही नियम, खर्च आणि संघटनात्मक निष्क्रियतेमुळे त्याचा स्वीकार करण्यास वेळ लागतो.
“अलीकडेच इक्विटी-रिसर्च संस्था सिट्रिनीने २०२८ पर्यंत एआय बहुतेक व्हाईट कॉलर नोकऱ्यांची जागा घेईल असा अंदाज वर्तवल्यानंतर वित्तीय बाजारपेठेत भीती पसरली होती. परंतु हा अंदाज काही बाबतीत निश्चितपणे अतिशय निराशावादी आहे”, असे राजन यांनी नमूद केले.
इतिहास आपल्याला अशी अनेक उदाहरणे देतो. १९२० च्या दशकातच स्वयंचलित टेलिफोन एक्सचेंज शक्य झाले होते, तरीही मानवी ऑपरेटर्स कित्येक दशके सेवेत राहिले. राजन यांनी नमूद केल्याप्रमाणे, “जरी १९२० च्या दशकात स्वयंचलित टेलिफोन एक्सचेंज शक्य झाले होते, तरीही अमेरिकेतील शेवटच्या मानवी टेलिफोन ऑपरेटरची जागा १९८० च्या दशकापर्यंत घेतली गेली नव्हती.”
एआयमुळे नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात
राजन यांनी टोकाच्या अंदाजांबाबत सावधगिरी बाळगण्याचे दुसरे कारण म्हणजे नवीन तंत्रज्ञान अनेकदा अनपेक्षित नोकऱ्या निर्माण करते. जरी काही कंपन्यांची जागा एआय-आधारित कंपन्यांनी घेतली, तरी कमी खर्च आणि उच्च उत्पादकतेमुळे होणारे आर्थिक बदल पूर्णपणे नवीन उद्योग उभे करू शकतात.
“एआयमुळे होणारी खर्च कपात आणि उत्पादकता वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नवीन संधी केवळ एआयकडेच जातील असे नाही. इंटरनेटच्या उदयामुळे जसे ‘इन्फ्लुएन्सर्स’ तयार झाले, तसेच या नवीन संधींसाठी मानवी श्रमाचीदेखील आवश्यकता भासू शकते”, असे त्यांनी स्पष्ट केले.
