Sachin Tendulkar OpenAI ChatGPT partnership : भारतीय क्रिकेटचा गॉड ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांनी आपल्या नव्या इनिंगची घोषणा केली आहे. यावेळी त्यांचा सलामीचा जोडीदार कोणी खेळाडू नसून चक्क AI असणार आहे. सचिन तेंडुलकर यांनी सोमवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनएआय’ सोबत अधिकृत भागीदारी केली असल्याचे सांगितले. या भागीदारीमुळे कृत्रिम प्रज्ञा आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिनने नेमकी काय घोषणा केली?

सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एक पोस्ट शेअर करून या भागीदारीची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “ओपनएआयसोबत भागीदारी करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्याकडे काहीतरी नवीन आणि रंजक घेऊन येत आहे, जे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

ते पुढे म्हणाले, “माझी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नवीन शिकण्याची आणि कुतूहल बाळगण्याची सवय आहे. एक प्रश्न विचारला की, त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो आणि चॅटजीपीटीने या सवयीला आणखी प्रोत्साहन दिले आहे. माझ्या कुटुंबाच्या सहलीचे नियोजन करण्यासारख्या गोष्टींमध्येही चॅटजीपीटी खूप उपयुक्त ठरले आहे.”

या भागीदारी अंतर्गत, सचिन चॅटजीपीटीच्या नवीन उपयोगांचा शोध घेणार असून लोकांना त्यांच्या आवडीनुसार या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते चॅटजीपीटीला काही प्रश्न विचारुन स्वतःला ओळखण्याचा खेळ खेळताना दिसत आहेत.

सचिन तेंडुलकर यांची ब्रँड व्हॅल्यू

सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन १२ वर्षे झाली आहे आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या नावाची क्रेझ जराही कमी झालेली नाही. उलट दिवसेंदिवस त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ होत चालली आहे. सचिन यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यांत सर्वाधिक ३४,३५७ धावा नोंद आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ आणि एकदिवसीय सामन्यांत १८,४२६ धावा केल्या असून त्यांच्या नावावर १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा ऐतिहासिक विक्रम आहे.

ओपनएआयचा वाढता विस्तार

ओपनएआय जगभरात आपल्या सेवांचा विस्तार करत आहे. कंपनीने अलीकडेच ‘चॅटजीपीटी फॉर फायनान्शियल सर्व्हिसेस’ हा नवा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. इन्व्हेस्टमेंट बँकिंग, इक्विटी रिसर्च आणि फायनान्शियल मॉडेलिंगसाठी हा प्लॅटफॉर्म फायदेशीर ठरत आहे.