Sam Altman ChatGPT Water Consumption Defense: डेटा सेंटर्सकडून होणाऱ्या पाणी वापराबाबतच्या चिंता फेटाळून लावताना ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सांगितले की, चॅटजीपीटीवरील ३८ हजार प्रश्नांसाठी लागणारे पाणी हे केवळ एका बदामाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या पाण्याइतकेच असते. नुकतेच ‘सोर्सेस’ पॉडकास्टच्या एका भागात ॲलेक्स हीथ यांच्याशी संवाद साधताना, सॅम ऑल्टमन यांनी याबाबत भाष्य केले आहे.

ऑल्टमन म्हणाले, “तुम्हाला माहीत आहेच, चॅटजीपीटीच्या पाणी वापराबाबतची एक चर्चा मी पाहिली होती. त्यात असे म्हटले होते की, जेव्हा तुम्ही चॅटजीपीटीवर एखादा प्रश्न विचारता तेव्हा ते एखाद्याने सहा तास शॉवर चालू ठेवण्यासारखे असते जे पाणी पुन्हा कधीच वापरता येत नाही आणि ते वाया जाते.”

त्यांनी पुढे सांगितले की, कॅलिफोर्नियामध्ये केवळ एका बदामाच्या उत्पादनासाठी जेवढे पाणी लागते, तेवढ्या पाण्यात चॅटजीपीटीवरील ३८ हजार प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांच्याकडे याचे नेमके आकडे सध्या उपलब्ध नाहीत.

बदाम खाणाऱ्यांना हे चुकीचे वाटत नाही का?

ऑल्टमन पुढे म्हणाले, “हा प्रश्न निर्माण होतो की ही माहिती कुठून आली, कारण एकावेळी १२ बदाम खाणाऱ्या लोकांना सहसा असे वाटत नाही की ते पाण्याच्या वापराच्या दृष्टीने काहीतरी खूप चुकीचे किंवा हानिकारक करत आहेत.”

“हे खरे आहे की एकेकाळी डेटा सेंटर्समध्ये ‘इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग’ वापरली जात असे, परंतु आता बऱ्याच काळापासून ही प्रक्रिया बंद आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या आधुनिक आणि अतिशय मोठ्या डेटा सेंटरकडे पाहिले, तर तिथे वापरले जाणारे पाणी हे एखाद्या ऑफिस बिल्डिंगमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांकडून नळ, टॉयलेट इत्यादींच्या वापराद्वारे खर्च होणाऱ्या पाण्याइतकेच असते.”

त्यांनी नमूद केले की, डेटा सेंटर्सच्या पाणी वापराबाबतच्या तक्रारी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय किंवा ‘मीम’ बनल्या आहेत, परंतु त्या तक्रारींच्यामागे कोणताही अभ्यास किंवा तर्क नाही.

एआय, बदाम आणि पाणी…

अमेरिकेत आणि विशेषतः दुष्काळग्रस्त असलेल्या कॅलिफोर्निया राज्यात, बदाम हे सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांपैकी एक मानले जाते. आलमंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्नियाच्या माहितीनुसार एका बदामाच्या उत्पादनासाठी साधारणपणे १ गॅलन पाणी लागते. मात्र, यात संपूर्ण प्रक्रियेचा म्हणजेच झाड लावण्यापासून ते त्याच्या वाढीपर्यंतच्या काळाचा समावेश असतो. आलमंड बोर्डाने सांगितले की, पिस्ते, अक्रोड आणि पीच यांसारख्या कॅलिफोर्नियातील इतर फळे आणि सुकामेवा देणाऱ्या झाडांच्या लागवडीसाठी लागणाऱ्या पाण्याइतकेच हे प्रमाण आहे.