Snapchat AR Glasses Specs : तुम्ही आयर्नमॅन चित्रपट पाहिला आहे का? त्यातील नायक ‘टोनी स्टार्क’ एक लोखंडी सूट घालत असतो. त्याच्या हेल्मेटची काच म्हणजे एखाद्या संगणकाची पारदर्शक स्क्रीनच जणू. कसलं भारी ना? आपल्याकडे असं काही असतं तर किती मज्जा आली असती. तुमचं हे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. प्रसिद्ध मेसेजिंग अॅप स्नॅपचॅटची मूळ कंपनी ‘स्नॅप’ने आता ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. कंपनीने १६ जून २०२६ रोजी आपले पहिलेवहिले ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) ग्लासेस सादर केले आहेत. या चष्म्यात थेट मोबाईलसारखी स्क्रीन असणार आहे.
केबल आणि बॅटरी पॅकचे टेन्शन नाही!
स्नॅप कंपनीला हे एआर ग्लासेस सर्वसामान्य चष्म्यासारेखच सुटसुटीत बनवायचे होते. म्हणूनच, या चष्म्याला कोणतीही बाह्य केबल, अतिरिक्त बॅटरी पॅक किंवा वेगळे गॅझेट जोडण्याची गरज नाही. सर्व तांत्रिक यंत्रणा आणि बॅटरी चष्म्याच्या फ्रेममध्येच बसवण्यात आली आहे. दिसायला हा चष्मा थोडा मोठा आणि जाड वाटत असला, तरी तो एक आकर्षक आणि फ्युचरिस्टिक लुक देतो.
‘स्पेक्ट्स’मध्ये काय विशेष आहे?
- हा चष्मा ४७ मिमी आणि ५२ मिमी अशा दोन आकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यांना आधीच चष्म्याचा नंबर आहे, त्यांच्यासाठी यामध्ये बदलता येण्याजोग्या लेन्स लावण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
- चष्म्याच्या दोन्ही बाजूंना कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच लेन्सच्या मध्ये एक एलईडी पट्टी लावण्यात आली आहे, जी चष्म्यातून रेकॉर्डिंग सुरू असल्याचे समोरचे व्यक्तीला दिसते
- स्नॅपने यामध्ये ‘लिक्विड क्रिस्टल ऑन सिलिकॉन’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे वापरकर्त्याला स्पष्ट चित्र आणि उत्कृष्ट रंग पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, आजूबाजूच्या प्रकाशानुसार याच्या लेन्स अवघ्या १० सेकंदांत पारदर्शक ते रंगीत अशा बदलू शकतात.
- या चष्म्यात दोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर बसवण्यात आले आहेत. हे प्रोसेसर कॉम्प्युटर व्हिजन, एआर अनुभव, हाताच्या हालचाली ट्रॅक करणे आणि इतर कठीण टास्क सहज पूर्ण करतात.
- एका चार्जिंगवर हा चष्मा सलग ४ तास चालू शकतो. यासोबत मिळणाऱ्या चार्जिंग केसमुळे तब्बल २० तासांपर्यंतची अतिरिक्त बॅटरी लाईफ मिळते.
किंमत आणि कधी बाजारात येणार?
स्नॅपच्या या प्रगत ‘Specs’ ची किंमत २,१९५ डॉलर्स म्हणजे सुमारे १.९ लाख रुपये आहे. या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात हा चष्मा अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतीय बाजारात हा चष्मा कधी उपलब्ध होणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मेटा-अॅपलला मिळणार स्पर्धक
फेसबुकची मूळ कंपनी मेटा आणि अॅपल सारख्या दिग्गज कंपन्या आधीच एआर आणि व्हीआर क्षेत्रात आघाडीवर आहेत. मेटाचा चष्मा बाजारात उपलब्ध आहे. आता स्नॅपने आणलेले हे वजनाने हलके आणि केबलमुक्त ‘Specs’ भविष्यातील तंत्रज्ञानाची दिशा बदलणारे ठरू शकतात. त्यामुळे भविष्यात मोबाईलची जागा चष्म्याने घेतली तर नवल वाटायलं नको.
