Sridhar Vembu Zoho AI Statement : गेल्या ५ दशकांहून अधिक काळ भारतीय आयटी कंपन्यांनी अमेरिकेसह संपूर्ण जगाला सॉफ्टवेअर, सल्ला आणि डिजिटल सेवा पुरवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या क्षेत्रामुळे सर्वसामान्य तरुणांच्या हातात पाण्यासारखा पैसा आला, शहरांची भरभराट झाली आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागला. इथे करिअर करण्यासाठी तरुणांची नेहमीच चढाओढ असते. गेल्या २ वर्षात ही परिस्थिती बदलली असून, नवीन नोकरी सोडा, आहे त्याच कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञ आणि ‘झोहो’चे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी आयटी क्षेत्रातील रोजगारावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केलं आहे.

नवीन नोकऱ्या निर्माण करण्यात अपयश

श्रीधर वेंबू पुढे म्हणाले , “झोहोसह भारतीय आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात टाळली असली, तरी गेल्या काही वर्षांत नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात हे क्षेत्र अपयशी ठरले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी उपलब्ध असलेला पैसा आता AI तंत्रज्ञान विकसित करणे आणि डेटा सेंटर चालवण्याच्या वाढत्या खर्चासाठी वापरला जात आहे.” डेटा सेंटरच्या खर्चात प्रचंड वाढ झाली असून, सर्वर आणि मेमरी चिप्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हा सर्व खर्च नियंत्रणात आणण्यासाठी कंपन्या प्रयत्न करत असल्या, तरी अनेक गोष्टी त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआयचा बबल फुटणार?

एआयमुळे दिवसाचे काम आता काही सेकंदात होत आहे. मात्र, यात मोठा धोका असल्याचेही वेंबू यांनी नमूद केले. “एआयमुळे आपण जलद गतीने आणि अधिक प्रमाणात सॉफ्टवेअर तयार करायला लागलो, तर आधीच संपृक्त (Over-saturated) झालेल्या जागतिक बाजाराला खरोखरच आणखी सॉफ्टवेअरची गरज आहे का?” त्यांच्या मते, इतर वस्तूंच्या उद्योगांप्रमाणेच आता सॉफ्टवेअर क्षेत्रातही उत्पादनाच्या प्रमाणापेक्षा गुणवत्ता, विश्वासार्हता आणि ब्रँड या गोष्टींना अधिक महत्त्व प्राप्त होईल, ज्यामुळे या क्षेत्राचा वाढीचा दर अत्यंत मंदावेल.

तसेच, जगातील बड्या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या नेहमीच्या आयटी खर्चाचे बजेट आता AI च्या तंत्रज्ञानाकडे वळवत आहेत. परंतु, AI कंपन्या आज ज्या प्रमाणात प्रचंड कर्ज काढून आणि भांडवली खर्च करत आहेत, त्या प्रमाणात त्यांना भविष्यात आर्थिक परतावा मिळेल की नाही, याबद्दल वेंबू यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे.

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र नोकऱ्यांची तूट भरून काढू शकेल?

आयटी क्षेत्रातील मंदीनंतर उत्पादन क्षेत्र तरुणांना रोजगार देईल का? यावर बोलताना वेंबू म्हणाले, “उत्पादन क्षेत्र ही नोकऱ्यांची तूट भरून काढू शकेल असे वाटत नाही. ऑटोमेशन आणि रोबोटिक्समुळे आता प्रचंड मोठे उत्पादन अगदी मोजक्या कर्मचाऱ्यांच्या बळावर शक्य होत आहे.” प्रगत तंत्रज्ञानामुळे वस्तूंचे उत्पादन स्वस्त होऊन ग्राहकांसाठी वस्तू परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात. मात्र, लोकांकडे त्या खरेदी करण्यासाठी उत्पन्नच उरले नाही, तर ही अर्थव्यवस्था कशी चालेल? असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इन्फोसिस करणार २०,००० फ्रेशर्सची भरती

एकीकडे श्रीधर वेंबू यांनी आयटी क्षेत्रातील आव्हानांवर प्रकाश टाकला आहे. तर दुसरीकडे इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांनी आयटी क्षेत्रात सकारात्मक वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीची लाट सुरू असताना इन्फोसिसने यंदा २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या एकूण महसुलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित सेवांचा वाटा ८.२ टक्क्यांवर पोहोचला आहे.