Tata Aeris compact sedan launch price : तुम्ही जर सणासुदीच्या काळात बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने आज आपली एकदम नवी आणि आकर्षक कॉम्पॅक्ट सेडान ‘टाटा एरिस’ (Tata Aeris) अधिकृतपणे लाँच केली आहे. विशेषतः वैयक्तिक कार खरेदीदारांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार डिझाइन करण्यात आली आहे. आधुनिक डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान, उत्कृष्ट सुरक्षा आणि शानदार मायलेजचा संगम असलेल्या या कारची सुरुवातीची किंमत पेट्रोल व्हेरिएंटसाठी केवळ ५.२९ लाख रुपयांपासून, तर सीएनजी व्हेरिएंटसाठी ६.२९ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते.
एक सेगमेंट, पण दोन भिन्न ग्राहक वर्ग!
सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या एकूण कार्सपैकी सुमारे ६५ टक्के कॉम्पॅक्ट सेडानचा आहे. मात्र, यातील बहुतेक गाड्या व्यावसायिक (टॅक्सी) वापराच्या दृष्टीने बनवल्या जात असल्याने वैयक्तिक ग्राहकांकडे पर्याय नव्हते. कारण, व्यावसायिक ऑपरेटर्सना टिकाऊपणा आणि मायलेज हवे असते, तर वैयक्तिक ग्राहकांना स्टाईल, क्लास आणि महत्त्वांकांक्षा दर्शवणारी कार हवी असते. टाटा मोटर्सने ही कसर भरुन काढली आहे. टाटा एरिस कधीही व्यावसायिक सेगमेंटमध्ये उतरवली जाणार नाही, म्हणजेच ही कार केवळ आणि केवळ वैयक्तिक आणि कौटुंबिक वापरासाठीच असेल, ज्यामुळे तिची एक वेगळी आणि प्रीमियम ओळख टिकून राहील. व्यावसायिक वापरासाठी कंपनीचा स्वतंत्र ‘एक्सप्रेस-टी’ ब्रँड आधीच कार्यरत आहे.
बजेटमध्ये प्रीमियम अनुभव
- टाटाने बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारी आकर्षक कार बाजारात उतरवली आहे.
- पेट्रोल मॅन्युअल (MT) : ‘स्मार्ट’ ट्रिम ५.२९ लाखांपासून सुरू, तर टॉप मॉडेल ‘अकम्प्लिश्ड’ ८.१९ लाखांपर्यंत जाते.
- पेट्रोल एएमटी (AMT) : ‘प्योर’ ट्रिम ६.६९ लाखांपासून सुरू, तर ‘अकम्प्लिश्ड’ ८.७४ लाखांपर्यंत येईल.
- आयसीएनजी (iCNG) पर्याय : सीएनजीप्रेमींसाठी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या सोयीसह ६.२९ लाखांपासून उपलब्ध. ड्युअल-सिलिंडर तंत्रज्ञानामुळे यात बूट स्पेसची कोणतीही कमतरता भासत नाही.
‘एरिस’ची प्रमुख वैशिष्ट्ये
- सिग्नेचर एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल्स, डायमंड-कट एरो अलॉय व्हील्स, इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स आणि ड्युअल-टोन ब्लॅक रूफमुळे ही कार दिसायला अत्यंतो रुबाबदार आणि मॉडर्न वाटते.
- कारच्या आत एरोलक्स व्हेंटिलेटेड लेदरेट सीट्स, २६.०३ सेमी एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, १२.७ सेमी डिजिटल क्लस्टर, ड्युअल स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग, ३५ हून अधिक कनेक्टेड फीचर्ससह ‘आयआरए’ (iRA) आणि ४१९ लिटरची मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे.
टाटा म्हणजे सुरक्षेची हमी
टाटा कंपनी म्हटलं की सुरक्षेची हमी नक्की मिळते. टाटाच्या ‘सेफ्टी डोम’ संकल्पनेवर आधारित या कारमध्ये ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड आहेत. तसेच ३६०-डिग्री एचडी कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल आणि आयसोफिक्स अँकर्स देण्यात आले आहेत.
