Tata Group Stocks Fall as markets react to N Chandrasekaran Tata Sons Resignation news: १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर, बुधवारी टाटा समूहाच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. याचबरोबर या घसरणीला कच्च्या तेलाच्या उच्च किमतींमुळे गुंतवणूकदारांच्या भावना कुमकुवत झाल्याने टाटा समुहाच्या शेअर्सच्या विक्रीला हातभार लागला.

चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिल्यानंतर, भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) च्या शेअर्समध्ये जवळपास ५ टक्क्यांची घसरण झाली आणि निफ्टी ५० निर्देशांकामध्ये सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा समूहाच्या कंपन्यांचा समावेश होता. सकाळी ११:०५ च्या सुमारास नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर या कंपनीचे शेअर्स ४.५५ टक्क्यांच्या घसरणीसह २,३३६.९० रुपये प्रति शेअर या भावाने व्यवहार करत होते.

त्यानंतर ‘टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स’च्या शेअर्समध्ये १.६ टक्क्यांची घसरण झाली, तर ‘टायटन कंपनी’चे शेअर्स १.३ टक्क्यांनी घसरले. ‘टाटा स्टील’ आणि ‘इंडियन हॉटेल्स कंपनी’च्या शेअर्समध्ये अनुक्रमे १.१३ टक्के आणि १.०४ टक्क्यांची घट झाली. टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

रॉयटर्सने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहाची धर्मादाय संस्था असलेल्या टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी विरोध दर्शवल्यानंतर, टाटा सन्सने फेब्रुवारीमध्ये चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला होता.

चंद्रशेखरन १९८७ मध्ये टाटा समूहात रुजू झाले होते. २०१७ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी २००९ मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी पद सोडण्याच्या शक्यतेबाबत चंद्रशेखरन यांनी आपल्या निकटवर्तीयांशी चर्चा केली होती. या सभेत टाटा सन्सचे भागधारक त्यांच्या फेरनियुक्तीबाबत मतदान करणार आहेत.

दरम्यान, सकाळी ११:१५ च्या सुमारास सेन्सेक्स ५४१.१२ अंशांनी घसरून ७७,६१३.१३ अंशांवर, तर निफ्टी १६८.२० अंशांनी घसरून २४,३०३.५० अंकांवर व्यवहार करत होता.