मुंबई : भारतीय वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स’ने आपल्या लोकप्रिय ‘टियागो’ कारचे बहुप्रतिक्षित नवीन व्हर्जन ‘नेक्स्ट जेन टियागो’ (Next Gen Tiago) आणि ‘टियागो.इव्ही’ (Tiago.ev) भारतीय बाजारपेठेत दाखल केल्या आहेत. गेल्या दशकभरात ७ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या टियागोचे हे नवीन रूप पेट्रोल, आयसीएनजी (iCNG) आणि इलेक्ट्रिक अशा तीनही पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याच्या पेट्रोल (ICE) आवृत्तीची किंमत अवघ्या ४.६९ लाख रुपयांपासून, तर इलेक्ट्रिक (EV) आवृत्तीची किंमत ६.९९ लाख रुपयांपासून सुरू होते. एकाच डिझाईन तत्त्वावर आधारित असलेली ही वाहने ग्राहकांना चांगला अनुभव देतील, असा दावा कंपनीने केला आहे.

लाखो भारतीय कुटुंबांसाठी हॅचबॅक कार आजही पहिली पसंती आहे. परंतु, दीर्घकाळापासून या श्रेणीकडे वाहन उद्योगाने हवे तितके लक्ष दिले नाही. ‘नेक्स्ट जेन टियागो’ ग्राहकांना अपेक्षेपेक्षा बरेच काही अधिक देऊन हीच कसर भरून काढेल. महागड्या वाहनांपुरती मर्यादित असलेली वैशिष्ट्ये आता हॅचबॅकच्या ग्राहकांना मिळतील, हेच खऱ्या अर्थाने आकांक्षांचे लोकशाहीकरण आहे, असे लाँचिंगप्रसंगी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शैलेश चंद्रा म्हणाले.

‘नेक्स्ट जेन टियागो’ची ५ प्रमुख वैशिष्ट्ये (५ ‘WOW’ फॅक्टर्स)

  • वॉव लुक्स : लक्षणीयरीत्या अद्ययावत केलेले आकर्षक बाह्य रूप आणि प्रीमियम अंतर्गत (Interior) डिझाईन.
  • वॉव टेक : या श्रेणीत पहिल्यांदाच ब्लाईंड व्ह्यू मॉनिटरसह ३६०° सराउंड व्ह्यू कॅमेरा सिस्टीम आणि प्रगत कनेक्टेड तंत्रज्ञान.
  • वॉव चॉइसेस: पेट्रोल, आयसीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा तीनही इंजिन पर्यायांमध्ये एकाच वेळी उपलब्ध.
  • वॉव सेफ्टी: सुरक्षेला चैनीची वस्तू न मानणारे अधिक मजबूत आणि प्रगत सुरक्षा पॅकेज.
  • वॉव इकॉनॉमिक्स: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी किंमत आणि कमी देखभाल खर्च.

‘टियागो इव्ही’ बदलणार बाजाराचे गणित!

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत मोठा वाटा उंचावण्यासाठी टाटाने ‘नेक्स्ट जेन टियागो.इव्ही’च्या माध्यमातून हुकमी एक्का टाकला आहे. १२ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या हॅचबॅक श्रेणीत सध्या ईव्हीचा वापर अवघा २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. हे चित्र बदलण्यासाठी ही कार अत्यंत फायदेशीर ठरेल.

इलेक्ट्रिक वाहनामध्ये विशेष काय?

  • लाईफटाईम बॅटरी वॉरंटी: ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिल्यांदाच टियागो.इव्हीसोबत ‘लाइफटाईम बॅटरी एचव्ही वॉरंटी’ दिली जात आहे.
  • सुपरफास्ट चार्जिंग: अवघ्या १८ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार तब्बल १०० किलोमीटरची रेंज देईल, इतके प्रगत फास्ट चार्जिंग यात आहे.
  • किंमत वसुली: दैनंदिन खर्चात होणाऱ्या प्रचंड बचतीमुळे अवघ्या चार ते पाच वर्षांत वाहनाची संपूर्ण किंमत वसूल होईल, असा कंपनीचा दावा आहे.

मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाला डोळ्यांसमोर ठेवून टाटा मोटर्सने तयार केलेली ही हॅचबॅक बाजारपेठेत नवसंजीवनी आणू शकते. प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक पर्याय आणि मुख्य म्हणजे ‘सुरक्षा’ या तीनही आघाड्यांवर कोणतीही तडजोड न करता आणलेली ही ‘नेक्स्ट जेन टियागो’ मारुती आणि ह्युंदाईसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.