TCS Anthropic AI partnership : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जागतिक शर्यतीत भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. टीसीएसने जागतिक स्तरावर आपला बिझनेस वाढवण्यासाठी जगातील आघाडीची एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’ सोबत हातमिळवणी केली आहे. विशेष म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा यांच्यात भारतातील पहिल्या एआय डेटा सेंटरसाठी झालेल्या करारानंतर अवघ्या २४ तासांत टाटा समूहाने हा निर्णय घेतला आहे.
टीसीएसच्या ५०,००० कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग
या भागीदारीअंतर्गत टीसीएस आपल्या इंजिनिअरिंग, फायनान्स, कायदेशीर, मार्केटिंग आणि सेल्स विभागातील तब्बल ५०,००० कर्मचाऱ्यांना ‘क्लोड एआय’चा थेट ॲक्सेस देणार आहे. कंपनीने सांगितले की, या अंतर्गत अंमलबजावणीमुळे त्यांना प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळेल आणि त्याच वेळी ग्राहकांसाठी ‘एआय’ प्रोग्राम्सना अधिक गती देता येईल. याशिवाय, टीसीएसच्या ‘iON’ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आणि कर्मचाऱ्यांना क्लोड मॉडेल्सवर कोर्सेस उपलब्ध करुन दिले जाणार आहे, ज्यामुळे एआय क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल.
पायलट प्रोजेक्ट्सच्या पुढे जाण्याचे ध्येय
सध्या अनेक कंपन्यांचे एआय प्रोजेक्ट्स हे केवळ प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहेत. या प्रकल्पांना थेट उत्पादनात आणि दैनंदिन कामकाजात आणणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. “उद्योगांमध्ये एआयचे खरे मूल्य हे व्यवसायाचा संदर्भ समजून घेण्यात आणि गुंतागुंतीच्या सिस्टीम्स हाताळण्यात असते. विशेषतः बँकिंग, आरोग्य आणि विमान वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये जिथे गोपनीयता, विश्वास आणि सरकारी नियमांचे पालन अत्यंत कडक असते, तिथे आमचे कौशल्य आणि क्लोड एआय एकत्र येऊन ग्राहकांना जलद गतीने काम करण्यास मदत करतील.”, असा विश्वास टीसीसीचे सीईओ के. कृतीवासन यांनी व्यक्त केला.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, की “एआय हे जागतिक स्तरावर व्यवसायांचा कायापालट करणारे ठरेल यावर आमचा ठाम विश्वास आहे. अँथ्रोपिकची क्षमता आणि टाटा समूहाचा अफाट विस्तार एकत्र येऊन देशातील तरुणांना एआय युगात नेतृत्व करण्यासाठी सक्षम करेल.”
अँथ्रोपिकसाठी भारत ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ
अँथ्रोपिकचे सह-संस्थापक आणि सीईओ डॅरिओ अमोदेई म्हणाले, की “आम्ही क्लोड एआयची निर्मिती ही सुरक्षा आणि अचूकतेला प्राधान्य देऊन केली आहे. भारत ही आमची जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असून टीसीएससोबतच्या या भागीदारीमुळे आमची भारतातील कटिबद्धता अधिक घट्ट झाली आहे.”
दोन्ही कंपन्या नेमकं काय काम करणार?
दोन्ही कंपन्या एकत्रितपणे वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, लाईफ सायन्सेस, सरकारी सेवा, टेलिकॉम, विमान वाहतूक आणि मेडटेक या क्षेत्रांसाठी विशेष एआय सेवा पुरवणार आहेत. युनायटेड किंगडममध्ये टीसीएसचा ‘डिलिजेंटा’ हा प्लॅटफॉर्म ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी क्लोड एआयचा वापर सुरू करणार आहे.
