TCS Employee Monitoring Software DXM implementation updates and privacy implications: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या लॅपटॉपवर डिजिटल यूजर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग नावाचे एक टूल इन्स्टॉल केले आहे. कपंनीने हा निर्णय तंत्रज्ञानाद्वारे कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी घेतला आहे की कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, हे टूल टीसीएसला कर्मचारी कोणते ॲप्लिकेशन्स वापरतात आणि त्यावर किती वेळ घालवतात, यासारखा तपशील देते. कंपनीमध्ये या निर्णयाकडे दोन दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. एक म्हणजे कंपनीचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी उचललेले पाऊल आणि दुसरे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या डिव्हाइसवर काय घडते यावर अधिक नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग.

विशेष म्हणजे भारतातील आयटी आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात कर्मचाऱ्यांवर देखरेख करणारे सॉफ्टवेअर काही नवीन नाही. तरीही, अशा प्रकारचे टूल्स आणताना ज्याप्रमाणे टीसीएसकडून अधिकृत माहिती किंवा सूचना मिळणे अपेक्षित असते, तसे काहीही न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

“मला वाटते की, युजर्सचा अनुभव योग्य आहे का, ॲप्लिकेशन व्यवस्थित चालत आहे की हँग होत आहे आणि प्रत्येक ॲप्लिकेशनवर किती वेळ खर्च केला जात आहे, हे समजून घेणे हा यामागचा उद्देश असावा. जर तुम्ही एखाद्या क्लायंटसाठी इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापन करत असाल, तर हे एक महत्त्वाचे मोजमाप ठरते. पण हो, जर तुम्हाला करायचाच असेल, तर या टूलचा वापर देखरेखीसाठी नक्कीच केला जाऊ शकतो”, असे EIIRTrend चे सीईओ परीख जैन यांनी सांगितले.

टीसीएसचे निवेदन

टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या लॅपटॉपवर डिजिटल यूजर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग नावाचे टूल इन्स्टॉल केल्याचे वृत्त समोर येताच, कंपनीने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात कंपनीने म्हटले, “कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली जात असल्याबाबतचे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे. टीसीएस कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील वैयक्तिक हालचालींवर कोणतीही देखरेख ठेवत नाही, तसेच कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचा आदर आहे. कंपनीकडून व्यापक स्तरावरील नेटवर्क कार्यक्षमतेचे निरीक्षण करण्यासाठी विविध टूल्सचा वापर केला जातो. यामागचा उद्देश आमच्या कर्मचाऱ्यांसाठी नेटवर्कची सुरक्षा, उपलब्धता आणि अधिक चांगला ‘युजर एक्सपेरियन्स’ निश्चित करणे हा आहे.”

कॉग्निझंटही चर्चेत

गेल्या वर्षी, कॉग्निझंट कंपनी प्रोहान्स (ProHance) नावाचे वर्कफोर्स-मॅनेजमेंट टूल वापरल्यामुळे चर्चेत होती. हे टूल कंपनीच्या लॅपटॉपवरील हालचालींवर देखरेख ठेवते, ज्यात लॉगिनची वेळ, ॲप्लिकेशन आणि वेबसाइटचा वापर, तसेच कर्मचारी काम करत नसल्याचा कालावधी यांचा समावेश आहे. पण, हे टूल कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कामगिरी पाहण्यासाठी किंवा तिचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जात नसल्याचे कंपनीने म्हटले होते.