TCS Layoffs 30000 Employees Reason 2026: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे की, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) लिमिटेडमध्ये गेल्या सहा महिन्यांत जवळजवळ ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे, पण त्याचा एआयशी काहीही संबंध नाही.
“टीसीएसने याचे उत्तर दिले आहे. टीसीएसच्या नोकरकपातीचा त्याच्याशी (एआय) काहीही संबंध नाही. दुर्दैवाने जी काही चर्चा होत आहे ती होत राहील. परंतु मुळात, त्याचा एआयशी काहीही संबंध नाही”, असे एन. चंद्रशेखरन यांनी एआय इंडिया इम्पॅक्ट समिट २०२६ दरम्यान एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना सांगितले.
टीसीएसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानवकेंद्रित एआयच्या दृष्टिकोनाला पाठिंबा दिला. “मला वाटते की एआय मानवांना प्रचंड सक्षम करेल. पंतप्रधानांनी खूप सुंदरपणे सांगितले की आपल्याला मानवकेंद्रित एआयची आवश्यकता आहे आणि मला वाटते की ते शक्य आहे”, ते म्हणाले.
“आता आशा वर्कर्सचे उदाहरण पाहा. आशा वर्कर्स आधी फक्त डेटा गोळा करत होत्या, परंतु एआयच्या मदतीने आता त्या काळजीवाहू बनल्या आहेत. त्या पूर्वीपेक्षा खूप उच्च दर्जाचे काम करत आहेत”. असे टाटा सन्सचे अध्यक्ष पुढे म्हणाले.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, एआय लोकांना “उच्च दर्जाची कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेला प्रयत्न कमी करण्यास” मदत करते.
या एआय समिटकडे व्यवसाय करार करण्याचे ठिकाण म्हणून नव्हे, तर एआय तंत्रज्ञानाच्या नव्या गोष्टी शिकण्याची संधी म्हणून पाहत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.
“ही एक संधी आहे जिथे आपण वेगवेगळ्या कंपन्यांमधील सर्व अधिकाऱ्यांना भेटू शकतो, ते काय करत आहेत आणि भविष्य कसे विकसित होत आहे हे समजून घेऊ शकतो. तसेच हे एक असे व्यासपीठ आहे जिथे आपल्याला नवीन ज्ञान मिळेल”, असे टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणाले.
घाबरण्याची गरज नाही…
तत्पूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी म्हटले होते की, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) आयटी सेवा क्षेत्रातील संधी कमी नाहीत, तर उलट वाढत आहेत. कंपनी पायाभूत सुविधा, मॉडेल्स आणि अॅप्लिकेशन्स क्षेत्रात गुंतवणूक वाढवत असताना एआयमुळे विस्ताराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर सीएनबीसी-टीव्ही१८ शी बोलताना कृतिवासन यांनी एआयमुळे नोकऱ्यांवर परिणाम होईल ही भीती फेटाळून लावली होती. “घाबरण्याची गरज नाही, प्रत्येक वेळी तांत्रिक बदल किंवा व्यत्यय येतो तेव्हा कामाचा विस्तारच होतो”, असे ते म्हणाले होते.
