Tech Mahindra Layoffs 30000 Employees Rumor Truth: भारतातील आघाडीची आयटी कंपनी टेक महिंद्रा लिमिटेडने नोकर कपातीचा भाग म्हणून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याच्या सोशल मीडियावरील अफवेचे खंडन केले आहे.
आज (९ मार्च २०२६) एक्सचेंज फाइलिंगमध्ये टेक महिंद्राने पुष्टी केली आहे की कर्मचारी कपात योजनांचा उल्लेख करणाऱ्या ‘सोशल मीडिया पोस्ट’ पूर्णपणे खोट्या आहेत.
“कंपनीला कर्मचाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय कपता होण्याची शक्यता असल्याच्या बाजारातील अफवेबाबत काही कॉल आले आहेत आणि काही सोशल मीडिया पोस्टही निदर्शनास आल्या आहेत”, असे टेक महिंद्राने एक्सचेंजेसना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“वरील अफवा लक्षात घेता, कंपनी स्वतःहून स्टॉक एक्सचेंजेसना स्पष्ट करणे आवश्यक मानते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि अशा अफवा पूर्णपणे खोट्या आहेत”, असे निवेदनात पुढे म्हटले आहे.
कंपनीने असे म्हटले आहे की सध्या असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे नियोजन असल्याच्या अफवांना स्पष्टपणे नकार दिला आहे.
टेक महिंद्राचे स्पष्टीकरण सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल झालेल्या नोकर कपातीच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आले आहे, ज्यामध्ये एका युजरने असा दावा केला आहे की एआयच्या संभाव्य परिणामामुळे सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.
सोशल मीडियावर इतरही अनेक युजर्सनी टेक महिंद्रामधील संभाव्य कर्मचारी कपातीबद्दल पोस्ट केल्या आहेत. जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापराचा हा थेट परिणाम असल्याचे संकेत यातून मिळत आहेत, असा युजर्सचा सूर आहे.
टेक महिंद्राने अलीकडेच मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ऑन्टोलॉजी-चालित एजेंटिक एआय प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल, ज्याचा उद्देश टेलिकॉम आणि एंटरप्राइझ डेटा आधुनिकीकरणाला गती देणे आहे.
असे असले तरी कंपनीची कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्याची कोणतीही योजना नाही. टेक महिंद्राच्या ताज्या तिमाही आकडेवारीवरून असे दिसून येते की कंपनी जगभरात जवळजवळ १.५ लाख लोकांना रोजगार देते, ही संख्या कमी-अधिक प्रमाणात स्थिर राहिली आहे.
टेक महिंद्राच्या व्यवस्थापनाने गेल्या तिमाहीत स्पष्ट केले होते की कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत नसली तरी ते कर्मचाऱ्यांना काही प्रकल्पांतून काढून त्यांना नवीन कामात पुन्हा नियुक्त करून उत्पादकता वाढवत आहेत.
