Vehicle to Everything : भविष्यात वाहने एकमेकांशी संवाद साधू शकतील, असे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का? पण, ही गोष्ट आता फार दूर नाही. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ‘V2X’ तंत्रज्ञानासाठी सल्लागार पत्र जारी केले असून, यामुळे भारतीय रस्ते सुरक्षेचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘V2X’ तंत्रज्ञान?

‘V2X’ म्हणजेच ‘व्हेईकल टू एव्हरीथिंग’. हे एक असे कनेक्टिव्हिटी सिस्टीम आहे ज्यामध्ये तुमचे वाहन रस्त्यावरील इतर वाहने, ट्रॅफिक सिग्नल्स, पायाभूत सुविधा आणि इंटरनेट नेटवर्कशी जोडलेले असेल. थोडक्यात, तुमची गाडी केवळ रस्त्यावर धावणार नाही, तर ती आजूबाजूच्या परिस्थितीशी रिअल-टाइममध्ये संवाद साधेल.

अपघातांचे प्रमाण घटणार?

जर पुढे अपघात झाला असेल किंवा ट्रॅफिक जाम असेल, तर तुमच्या गाडीला आधीच अलर्ट मिळेल. अचानक ब्रेक लावणे, ब्लाइंड स्पॉट्स किंवा खराब हवामानाची माहिती ड्रायव्हरला आधीच मिळेल, ज्यामुळे अपघात टाळता येतील. भारतासारख्या देशात या तंत्रज्ञानाची खूप गरज आहे. कारण, देशात सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात होत आहेत.

सरकारकडून ‘स्पेक्ट्रम’ला मंजुरी

दूरसंचार विभागाने या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले स्पेक्ट्रम ‘डी-लाइसेंस’ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे कंपन्यांना हे तंत्रज्ञान वापरणे सोपे होईल आणि कायदेशीर अडथळे कमी होतील.

वाहतूक कोंडीतून सुटका

शहरांमधील ट्रॅफिक जॅम ही मोठी समस्या आहे. V2X मुळे ट्रॅफिक सिग्नल आणि वाहने एकमेकांशी जोडली गेल्याने वाहतुकीचा ओघ अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता येईल.

‘सेल्फ-ड्रायव्हिंग’ कारसाठी पाया

भविष्यातील विना-चालक गाड्यांसाठी V2X तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. टेस्ला सारख्या कंपन्यांच्या ऑटोमेटेड कार ट्रायल्समध्ये या तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असते. भारतातही आगामी काळात अशा प्रकारचे ट्रायल्स पाहायला मिळू शकतात. TRAI ने सध्या या तंत्रज्ञानाबाबत उद्योगक्षेत्र आणि जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. एक भक्कम आणि सुरक्षित फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर, हे तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनेल.

नवीन तंत्रज्ञानात सायबर सुरक्षेचा धोका?

हे तंत्रज्ञान केवळ चैनीसाठी नसून रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी काळाची गरज आहे. मात्र, सायबर सुरक्षेच्या दृष्टीने या गाड्यांचे हॅकिंग टाळण्यासाठी सरकारने कठोर नियमावली तयार करणे तितकेच आवश्यक आहे. एआयमुळे सायबर सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.