Uber Layoffs Job Cuts : आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रातील रोजगारावर संकट आले आहे. अशातच आता अ‍ॅप-आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या ‘उबर’ या कंपनीने आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १० टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे तब्बल ३,३०० कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. करोना महामारीनंतरची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. मे २०२० मध्ये कंपनीने ६,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते.

नोकरकपातीचे मुख्य कारण काय?

कंपनीचे सीईओ दारा खोस्रोशाही यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “गेल्या पाच वर्षांत उबेरचा मोठा विस्तार झाला, पण या वाढीसोबतच कंपनीची रचना गुंतागुंतीची झाली आहे. कामाचे अनेक टप्पे, समन्वय साधण्यात अडचणी आणि विखुरलेली जबाबदारी यामुळे निर्णय प्रक्रियेचा वेग मंदावला होता. त्यामुळे उबेरला अधिक गतिमान करणे आणि भविष्यातील तंत्रज्ञानासाठी निधी उभारणे, या दोन प्रमुख उद्देशांसाठी ही कपात केली जात आहे.”

रोबोटॅक्सी आणि AI मध्ये गुंतवणूक वाढवणार

‘सिटी’ या जागतिक गुंतवणूक बँकेच्या विश्लेषकांनी दिलेल्या अंदाजानुसार, या नोकरकपातीमुळे उबरकची वर्षाला अंदाजे ६,८०० कोटी रुपये बचत होणार आहे. हा निधी कंपनी स्वयंचलित गाड्या म्हणजेच ‘रोबोटॅक्सी’ आणि कृत्रिम प्रज्ञा (AI) तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी वापरणार आहे.

गुगल आणि टेस्लाला टक्कर

गुगल आणि टेस्ला या दोन्ही कंपन्या सध्या मानवरहित टॅक्सी म्हणजेच रोबोटॅक्सी क्षेत्रात आघाडीवर असून मोठ्या प्रमाणावर प्रयोग आणि व्यवसाय करत आहेत. आता उबेरही या क्षेत्रात उतरत असून आपल्या रोबोटॅक्सी नेटवर्कच्या विस्तारासाठी १० अब्ज डॉलरपेक्षा जास्त निधी गुंतवण्याचे आश्वासन दिले आहे. या वर्षात किमान १५ राज्यांमध्ये आपली रोबोटॅक्सी उतरवण्याची कंपनीची योजना आहे. सिटी बँकेचे विश्लेषक रोनाल्ड जोसी यांच्या मते, उबरची एआयमधील गुंतवणूकही नोकरकपातीला कारणीभूत ठरली आहे.

फूड डिलिव्हरी आणि बाजारातील स्पर्धा

अमेरिकेत उबरच्या ‘उबर ईट्स’ या फूड डिलिव्हरी व्यवसायाला ‘डोअरडॅश’कडून मोठे आव्हान मिळत आहे. अमेरिकेच्या फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये डोअरडॅशचा वाटा ६४% आहे, तर उबर ईट्सचा वाटा केवळ ३४% वर आला आहे. नोकरकपातीच्या बातमीनंतर उबरच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी यंदाच्या वर्षात कंपनीचा शेअर एकूण ७ टक्क्यांनी घसरला आहे.

एआयमुळे जगभराच नोकरकपातीची लाट

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या एआय आणि ऑटोमेशनमुळे नोकरकपातीची मोठी लाट आली आहे. ‘Layoffs.fyi’ या ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, या वर्षात आतापर्यंत जगभरातील सुमारे ३९० कंपन्यांनी १,२३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.