Impact on Indian IT Engineers H1B Visa Stock Market: अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा डेमोक्रॉटिक पक्षाने धुव्वा उडवला. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहात डेमोक्रॉटिक पक्ष बहुमतात आल्याने ट्रम्प यांच्या मनमानी निर्यांना चाप लागणार आहे. यात प्रामुख्याने आयटी (IT) क्षेत्रातील भारतीय H-1B व्हिसा अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता, तसेच मध्यपूर्वेतील तणाव कमी होणे आणि रशियावरील निर्बंधांत शिथिलता येणे, यांसारख्या बाबींमुळे आयटी आणि तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांना सल्ला देण्यात आला आहे की, तेल क्षेत्रातील शेअर्स निवडताना त्यांनी तेल शुद्धीकरण कंपन्यांचा विचार करावा. कारण या कंपन्या डिझेलच्या निर्यातीतून मोठा नफा मिळवतात. विशेष म्हणजे, अमेरिका-इराण संघर्षाच्या काळात डिझेलच्या किमती प्रति बॅरल १०८ डॉलर्सवरून थेट २०० डॉलर्सपर्यंत पोहोचल्या होत्या.
आयटी आणि तेल कंपन्यांच्या शेअर्सबद्दल तेजीची अपेक्षा
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना, एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये बसलेल्या धक्क्यामुळे दोन्ही सभागृहांचे नियंत्रण डेमोक्रॅट्सच्या हाती गेले आहे. यामुळे भारतीय शेअर बाजारासाठी दिलासा आणि धोरणात्मक संघर्ष या दोन्ही गोष्टी निर्माण झाल्या आहेत.
आयटी इंजीनिअर्सना कसा होणार फायदा?
२०२६ च्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर आयटी आणि टेक क्षेत्राला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करताना सीमा श्रीवास्तव म्हणाल्या, “डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कुशल विदेशी कर्मचाऱ्यांवरील आक्रमक निर्बंध आणि एच-१बी व्हिसाच्या प्रचंड शुल्काला विरोध करेल अशी अपेक्षा आहे. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतीय आयटी कंपन्यांना दिलासा मिळेल, ज्यामुळे टेक कंपन्यांच्या शेअर्सना चालना मिळेल.”
ट्रम्प यांच्या पराभावाचा दलाल स्ट्रीटवर जल्लोष
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर अमेरिकन बाँड मार्केट आणि अमेरिकन डॉलरमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी आणि इतर प्रमुख बाजार निर्देशांकांसह जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
मुंबई शेअर बाजार सुसाट
दुपारी १:०० वाजता सेन्सेक्स १,७५३.१० अंशांनी वाढून ७९,०५४.५० वर पोहोचला, तर निफ्टी ५००.५० अंशांनी वाढून २४,४६१.१० वर व्यवहार करत होता. बाजारात सुमारे २,८४० शेअर्समध्ये वाढ झाली, १,१५८ शेअर्समध्ये घसरण झाली, तर १४२ शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
