Vasant Narsinhan Board Member Anthropic AI: अँथ्रोपिकने औषधनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज स्विस कंपनी नोव्हार्टिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत नरसिंहन यांची आपल्या संचालक मंडळावर नियुक्ती केली आहे. नरसिंहन हे या एआय स्टार्टअपच्या संचालक मंडळात सहभागी होणारे आरोग्य क्षेत्रातील पहिलेच कार्यकारी अधिकारी ठरले असून, कंपनीसाठी हा एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे. याकडे आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जीवशास्त्र (Life Sciences) या क्षेत्रांना जोडणारी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिले जात आहे.
क्लॉड एआय मॉडेल्सची निर्माता असलेल्या अँथ्रोपिक कंपनीने स्वतःला विशेष औद्योगिक वापरांमधील एक प्रमुख एआय कंपनी म्हणून प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. वसंत नरसिंहन यांची नियुक्ती हे ‘जेनरेटिव्ह एआय’ आणि ‘औषध संशोधन’ यांच्या एकत्रिकरणावर अँथ्रोपिक आपले लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत देते.
नोव्हार्टिसच्या सीईओंच्या मते, प्रगत वैद्यकशास्त्रासाठी एआय ही काळाची गरज आहे. “वैद्यकशास्त्र, नवोपक्रम आणि जागतिक आरोग्य या क्षेत्रांमध्ये काम केल्यामुळे मला हे जाणवले आहे की, तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर केल्यास ते सर्वाधिक मूल्य निर्माण करते. म्हणूनच मी अँथ्रोपिकच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास उत्सुक आहे,” असे वसंत नरसिंहन यांनी लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये लिहिले.
कोण आहेत वसंत नरसिंहन?
भारतीय वंशाच्या नरसिंहन यांनी जागतिक कीर्तीच्या संस्थांमधून विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी शिकागो विद्यापीठातून जैविक विज्ञानाची पदवी संपादन केली आणि त्यानंतर हार्वर्डमधून ‘एम.डी.’ पदवी मिळवली.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या माहितीनुसार, त्यांनी हार्वर्ड केनेडी स्कूलमधून ‘सार्वजनिक धोरण’ (Public Policy) विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले असून, अशा प्रकारे त्यांनी विज्ञान, वैद्यकशास्त्र आणि धोरण यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे आपला ठसा उमटवला आहे.
वसंत नरसिंहन यांचा पगार
नोव्हार्टिसच्या २०२२ च्या वार्षिक अहवालानुसार, वसंत नरसिंहन यांचे त्या वर्षातील एकूण प्राप्त मानधन ७५.५ कोटी रुपयांहून अधिक इतके होते. यामध्ये बोनस आणि स्टॉक ऑप्शन्स यांचाही समावेश आहे. याचच अर्थ असा की नरसिंहन यांना दिवसाला २० लाख रुपयांहून अधिक पगार मिळत आहे.
कारकीर्द
२०१८ पासून ‘नोव्हार्टिस’चे नेतृत्व करणारे नरसिंहन यांच्याकडे, गुंतागुंतीच्या जागतिक नियमावलींचे पालन करण्याबाबत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाशी संबंधित नैतिक बाबींचे व्यवस्थापन करण्याबाबतचा दांडगा अनुभव आहे.
आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, वसंत नरसिंहन यांनी जागतिक आरोग्याच्या आघाडीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या प्रदेशांमध्ये HIV/AIDS, मलेरिया आणि क्षयरोग विषयक कार्यक्रमांचे नेतृत्व केले.
हे पायाभूत कार्यच आजही जागतिक आरोग्य समता आणि औषधोपचारांची व्याप्ती वाढवण्याबाबतच्या त्यांच्या आग्रही भूमिकेला सातत्याने चालना देत आहे.
