Mukesh Ambani statement on AI and jobs at AI Impact Summit: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि समाजातील विविध घटकांमध्ये वाढत आहे. तज्ज्ञ कर्मचाऱ्यांवर त्याचा कसा परिणाम होईल याबद्दल अंदाज वर्तवले जात आहेत. एआयमुळे नोकऱ्या जातील की रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, यावर जगभरात जोरदार चर्चा होत आहे. अशात, नवी दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एआयमुळे नोकऱ्या जाणार नाहीत, हे सिद्ध करू असे म्हटले आहे.

एआय आणि नोकऱ्या

भविष्यात एआयच्या माध्यमातून अनेक कामे स्वयंचलित पद्धतीने होतील आणि परिणामी अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, या चिंतेचे निराकरण करताना मुकेश अंबानी यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “आम्ही हे सिद्ध करू की एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही. उलट, ते नवीन उच्च-कौशल्यपूर्ण कामाच्या संधी निर्माण करेल.”

परवडणाऱ्या दरात एआय

मुकेश अंबानी यांनी यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत एक मोठी घोषणा देखील केली. ते म्हणाले की, ज्याप्रमाणे जिओने देशात परवडणाऱ्या दरात इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला, त्याचप्रमाणे आता सामान्य भारतीयांनाही परवडणाऱ्या दरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपलब्ध करून दिले जाईल. त्यांनी सांगितले की, “भारत बुद्धिमत्ता भाड्याने घेऊ शकत नाही. जिओ देशाला इंटरनेट युगातून इंटेलिजन्स युगात घेऊन जाईल.”

यासाठी जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील सात वर्षांत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. अंबानी म्हणाले की, ही गुंतवणूक भारतात एक मजबूत एआय पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्या दशकांसाठी आर्थिक बळकटी सुनिश्चित करण्यासाठी असेल.

स्थानिक भाषांमध्ये एआय

शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि लहान व्यवसायिकांना फायदा व्हावा यासाठी जिओ एआय भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल यावर अंबानी यांनी भर दिला. शिक्षणासाठी जिओ शिक्षा एआय, आरोग्यासाठी जिओ आरोग्य एआय, शेतीसाठी जिओ कृषी आणि सामान्य वापरासाठी जिओ भारत आयक्यू असे प्लॅटफॉर्म सादर करण्यात आले आहेत. हे स्थानिक भाषांमध्ये एआय सहाय्य देतील.