Xbox Layoffs Marathi News : आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या अनेक कंपन्यांसाठी पांढरा हत्ती बनत चालला आहे. एआयच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दिग्गज कंपन्या पाण्यासारखा पैसा ओतत आहेत. परिणामी खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने इतर उपक्रम बंद करावे लागत आहे. याचा फटका आता मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभाग ‘एक्सबॉक्स’ला बसला आहे. कंपनीत पुनर्रचनेचा भाग म्हणून सुमारे ३,२०० कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. कंपनीच्या सीईओ आशा शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत याची माहिती दिली. या प्रक्रियेत एक्सबॉक्स आपले चार मोठे व्हिडिओ गेम डेव्हलपमेंट स्टुडिओ विकणार आहे. या कपातीनंतर आशा शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे.
कोण आहेत आशा शर्मा?
भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांनी २०११ मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभाग एक्सबॉक्सच्या सीईओपदी नियुक्ती झाली. यापूर्वी, त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये ‘कोअर एआय’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मेटामध्ये ‘प्रॉडक्ट अँड इंजिनिअरिंग’च्या उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आशा शर्मा यांनी इंस्टाग्रामच्या सीईओ म्हणूनही काम केले आहे. त्यांनी होम डेपो आणि कूपँग सारख्या बड्या कंपन्यांसोबतही काम केले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा येथील कार्लसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून आशा यांनी शिक्षण घेतले आहे.
सध्या आमचा व्यवसाय सुस्थितीत नाही – आशा शर्मा
कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात सीईओ आशा शर्मा यांनी स्पष्ट केले की, “कंपनी सध्या अत्यंत गंभीर आर्थिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना करत आहे. एक्सबॉक्सचा अंतर्गत नफा दर अवघ्या ३ टक्क्यांवर घसरला आहे. हा नफा इतर समकालीन गेमिंग कंपन्यांच्या तुलनेत तब्बल ३ ते १० पटीने कमी आहे. संपूर्ण गेमिंग जग सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या हार्डवेअर मंदीचा सामना करत आहे, ज्याचा फटका एक्सबॉक्सलाही बसला आहे. ‘गेम पास’ आणि मल्टि-प्लॅटफॉर्म कंटेंटवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करूनही अपेक्षेप्रमाणे व्यावसायिक वाढ झालेली नाही. आपल्याला एक्सबॉक्सला पुन्हा एकदा नवीन रूप द्यावेच लागेल, त्यासाठीच हा कठोर निर्णय घेतला आहे.”
कशी होणार नोकरकपात
एक्सबॉक्समध्ये २ टप्प्यात कर्मचारी कपात होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६०० कर्मचाऱ्यांना तत्काळ प्रभावाने कमी करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे पुढील १२ महिन्यांच्या कालावधीत आणखी १६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात येणार आहे.
मायक्रोसॉफ्टच्या इतर विभागांनाही फटका
हा निर्णय केवळ एक्सबॉक्सपुरता मर्यादित नसून, मायक्रोसॉफ्टच्या इतर विभागांमधील आणखी ३,२०० कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले जात आहे. यात प्रामुख्याने विक्री टीमचा समावेश आहे. मायक्रोसॉफ्टच्या चीफ पीपल ऑफिसर एमी कोलमन यांनी सांगितले, उत्पादनांमधील बदल आणि ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांमुळे हे पाऊल उचलावे लागत आहे.
अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतरही आव्हाने कायम
मायक्रोसॉफ्टने २०२३ मध्ये तब्बल ६९ अब्ज डॉलर्स खर्च करून ‘ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड’ या दिग्गज गेमिंग कंपनी विकत घेतली होती. मात्र, इतकी मोठी गुंतवणूक करूनही एक्सबॉक्सला बाजारात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. कन्सोल हार्डवेअरच्या विक्रीत झालेली मोठी घसरण आणि ब्लॉकबस्टर ठरतील अशा नवीन गेमिंग टायटल्सची कमतरता यामुळे कंपनीचा महसूल कमालीचा घटला आहे.
