Zoho layoffs controversy 300 employees viral post truth and company response: ‘झोहो’ (Zoho) या क्लाउड-आधारित एंटरप्राइझ सॉफ्टवेअर कंपनीने, ३०० कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचे (ले-ऑफ) दावे फेटाळून लावले आहेत. ‘ब्लाइंड’ ॲपवर एक कथित पोस्ट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये कंपनीने सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचा आरोप करण्यात आला होता. तथापि, कंपनीने एका निवेदनाद्वारे, कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याच्या आपल्या दीर्घकालीन धोरणाचा (नो-ले-ऑफ पॉलिसी) पुनरुच्चार केला.

‘हिंदुस्तान टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना झोहोने स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना कामावरून न काढण्याची त्यांची तीन दशकांपासूनची परंपरा आजही अखंडित आहे.

ती व्हायरल पोस्ट नक्की काय होती?

झोहोबाबतच्या व्हायरल पोस्टमध्ये एका युजरने लिहिले होते, “मला नुकतेच, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ‘झोहो’मधून कामावरून काढून टाकण्यात आले आहे.”

या व्यक्तीने पुढे असाही दावा केला की, “सुमारे ३०० प्रशिक्षणार्थींना (Trainees) अचानक कामावरून कमी करण्यात आले.” वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जागी प्रशिक्षणार्थींना नेमण्याबाबत कंपनीत सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांशी या निर्णयाचा कथितरित्या संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

या युजरने पोस्टमध्ये काही वैयक्तिक चिंतांवरही प्रकाश टाकला आला होता, ज्यात असे नमूद केले होते की, “टीसीए, कॉग्निझंट आणि कॅपजेमिनीसारख्या इतर कंपन्यांच्या ऑफर्स सोडून मी ‘झोहो’ची निवड केली होती. काही काळासाठी मला बेंचवर (कामाशिवाय) बसावे लागले असते, तरीही त्या कंपन्यांमध्ये मला निदान काही प्रमाणात तरी स्थैर्य मिळाले असते”, असे युजरने म्हटले.

“या परिस्थितीचा मला खूप मोठा धक्का बसला आहे. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आर्थिकदृष्ट्या संघर्षमय आहे आणि ही नोकरी माझ्यासाठी केवळ करिअरमधील एक टप्पा नव्हती, तर ती अशी गोष्ट होती, जिच्यावर माझे संपूर्ण कुटुंब अवलंबून होते”, असे तो शेवटी म्हणाला.

झोहोने काय स्पष्टीकरण दिले?

झोहोने स्पष्ट केले की, संबंधित पोस्टमुळे त्यांच्या इंटर्नशिप कार्यक्रमाबाबत आणि पूर्णवेळ नोकरीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त (कामावरून कमी) करण्यात आलेली नाही.

झोहो कॉर्पोरेशनमधील ‘टॅलेंट ॲक्विझिशन आणि ग्लोबल एचआर ऑपरेशन्स’चे असोसिएट डायरेक्टर, मोहम्मद सोहेल यांनी स्पष्ट केले की, “संबंधित पोस्टमध्ये आमच्या इंटर्नशिप कार्यक्रमाला आणि प्रत्यक्ष नोकरीला एकच समजल्याचे दिसून येते. या दोन्ही बाबी पूर्णपणे वेगळ्या आहेत. इंटर्नशिप ही प्रामुख्याने शिकण्याच्या उद्देशाने केलेली एक प्रक्रिया असते आणि त्यातून आपोआपच पूर्णवेळ नोकरीची हमी मिळत नाही.”