नवी दिल्ली, पीटीआय

भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या ग्राहक संख्येत झालेल्या वाढीमुळे जूनमध्ये देशातील दूरसंचार ग्राहकांची संख्या किंचित वाढून १३४.८ कोटी झाली, अशी माहिती ‘टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया’ने अर्थात ‘ट्राय’ने मंगळवारी दिली.

भारतातील एकूण दूरसंचार ग्राहकांची संख्या मे २०२६ च्या अखेरीस १३४.३१ कोटींवरून जून २०२६ च्या अखेरीस १३४.८० कोटींपर्यंत वाढली, ज्यामुळे ०.३७ टक्के मासिक वाढीचा दर दिसून आला, असे क्षेत्राचे नियामक असलेल्या ‘ट्राय’ने जून २०२६ च्या मासिक ग्राहक अहवालात म्हटले आहे.

सरलेल्या जून महिन्यात ग्राहक वाढीमध्ये भारती एअरटेल आघाडीवर होती; मे महिन्याच्या तुलनेत कंपनीने ३१.६३ लाख नवीन ग्राहक जोडले. या वाढीमध्ये २९.८९ लाख मोबाईल ग्राहक आणि १.७३ लाख फिक्स्ड-लाइन जोडण्यांचा समावेश होता. त्यानंतर रिलायन्स जिओचा क्रमांक लागतो, ज्यांनी २२.९१ लाख ग्राहकांची निव्वळ भर घातली; यात मोबाइल विभागात २१.४६ लाख आणि फिक्स्ड-लाइन विभागात १.४४ लाख ग्राहकांचा समावेश होता. जूनमधील एकूण ६२ लाख नवीन ग्राहकांच्या वाढीपैकी ५४.५४ लाख (किंवा सुमारे ८७ टक्के) ग्राहक या दोन खासगी दूरसंचार कंपन्यांनी जोडले.

जूनमध्ये एकूण वायरलेस जोडण्यांची संख्या मे महिन्यातील १२९.४ कोटींवरून वाढून १३० कोटी झाली. यामध्ये ११४.७ कोटी ग्राहक सिम, १३.४७ कोटी एमटूएम सिम आणि फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस मिळविणाऱ्या १.७८ कोटी ग्राहकांचा समावेश होता. व्होडाफोन आयडियाने १.६३ लाख वायरलेस ग्राहकांची निव्वळ भर घातली. तर सरकारी मालकीच्या बीएसएनएलने या महिन्यात ९४,००६ ग्राहक जोडले. जून महिन्यात वायरलाइन (फिक्स्ड लाइन) ग्राहकांची संख्या १.६७ टक्क्यांनी घटून ४.७८ कोटींवर आली (मे महिन्यात ही संख्या ४.८६ कोटी होती); याचे मुख्य कारण म्हणजे बीएसएनएलने ७.९६ लाख फिक्स्ड लाइन ग्राहक गमावले.