Tim Cook Resigns Apple CEO : जगातील महाकाय टेक कंपनी ॲपलमध्ये मोठी खांदेपालट होत आहे. कंपनीला ३५० अब्ज डॉलर्सवरून ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणारे टिम कूक यांनी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून जॉन टर्नस नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अॅपलची सूत्रे हाती घेतील. कूक कंपनीतून पूर्णपणे बाहेर पडणार नसून ते एका नव्या भूमिकेतून अॅपलशी जोडलेले राहतील. टीम कूक यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, शालेय जीवनात वृत्तपत्र टाकणारा मुलगा ते अब्जाधीश सीईओ अशी त्यांनी अद्भूत यशाची कहाणी आहे.
वृत्तपत्र वाटण्यापासून सुरू झालेला टिम कूक यांचा प्रवास
१ नोव्हेंबर १९६० रोजी अमेरिकेतील अलाबामा येथे टिम कूक यांचा जन्म झाला. त्यांचे बालमन अतिशय सामान्य गेलं. वडील शिपयार्डमध्ये कामाला होते, तर आई फार्मसीमध्ये होती. टीम कूक कुटुंबात पहिली पदवीधर होते. अवघे ११-१२ वर्षांचे असताना कूक पहाटे ३ वाजता उठून वर्तमानपत्रे वाटायचे. पुढे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बर्गर बनवण्याचं कामही केलं. १९८२ मध्ये ऑबर्न युनिव्हर्सिटीमधून इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याच वर्षी त्यांना IBM मध्ये नोकरीची संधी मिळाली. नोकरी करतानाच १९८८ मध्ये त्यांनी ड्यूक युनिव्हर्सिटीच्या फूक्वा स्कूल ऑफ बिझनेसमधून रात्रीचं कॉलेज करत एम.बी.ए. पूर्ण केले. आयबीएममध्ये १२ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक्स आणि त्यानंतर कॉम्पॅकमध्ये उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.
१९९८ चे वळण आणि स्टीव्ह जॉब्स यांची साथ
१९९८ मध्ये अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी कूक यांना अॅपलमध्ये आणले. त्यावेळी अॅपल मोठ्या आर्थिक संकटात सापडली होती. कूक यांच्याकडे ‘वर्ल्डवाइड ऑपरेशन्स’ची जबाबदारी देण्यात आली. सप्लाय चेन आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंटमधील आपल्या कौशल्याच्या बळावर त्यांनी कंपनीची उत्पादन प्रक्रिया सुधारली, इन्व्हेंटरी कमी केली अन् ऑपरेशन्स अत्यंत कार्यक्षम बनवले.
स्टीव्ह जॉब्स जेव्हा आजारपणामुळे रजेवर असायचे, तेव्हा कूक यांनी अॅपलचे अंतरिम CEO म्हणूनही काम पाहिले. ऑगस्ट २०११ मध्ये कूक अॅपलचे स्थायी सीईओपदी नियुक्ती झाले, तर ऑक्टोबर २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर त्यांनी अॅपलची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
१५ वर्षांच्या कार्यकाळात अॅपलचा अभूतपूर्व विस्तार
टिम कूक यांच्या नेतृत्वात अॅपलचे मूल्यांकन आणि व्यवसाय अभूतपूर्व वेगाने वाढला आहे. २०११ मध्ये अॅपलचे बाजारमूल्य सुमारे ३५० अब्ज डॉलर होते, जे कूक यांच्या कार्यकाळात ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. फक्त आयफोनवर अवलंबून न राहता त्यांनी अॅपल वॉच, एअरपॉड्स, अॅपल सिलिकॉन चिप्स आणि व्हिजन प्रो यांसारखी उत्पादने बाजारात आणली. याशिवाय अॅप स्टोअर, अॅपल म्युझिक आणि अॅपल टीव्ही+ सारख्या ‘सर्व्हिसेस बिझनेस’चा मोठा विस्तार केला. कूक यांनी युझर प्रायव्हसी, पर्यावरण संरक्षण आणि अॅक्सेसिबिलिटी या विषयांना कंपनीच्या मुख्य धोरणांमध्ये समाविष्ट केले. सध्या कूक यांची अंदाजे संपत्ती सुमारे ३ अब्ज डॉलर आहे. ते २००५ पासून ‘नायकी’च्या संचालक मंडळातही समाविष्ट आहेत.
टीमचे मानले आभार..
कूक यांनी अॅपलचे नेतृत्व करणे हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान असल्याचे सांगत सहकारी टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. १ सप्टेंबरपासून अॅपलच्या नव्या युगाची सुरुवात होत असून, अॅपलच्या अनेक आधुनिक उत्पादनांचे मुख्य वास्तुकार मानले जाणारे जॉन टर्नस कंपनीला कोणत्या नव्या उंचीवर नेतात, याकडे संपूर्ण जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
