मुंबई: भारतीय शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सरलेल्या आठवड्यात देशातील टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ६ कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यात तब्बल १ लाख कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये ‘भारती एअरटेल’ आणि ‘बजाज फायनान्स’ या कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरले.
गेल्या आठवड्यात देशांतर्गत मजबूत आर्थिक संकेत, जीएसटीचे उत्तम संकलन आणि औद्योगिक क्षेत्रातील सुधारणांमुळे बाजाराला मोठा पाठिंबा मिळाला. सेन्सेक्स ६६३.४४ अंशांनी वधारला तर निफ्टीने २१४.८५ अंशांची कमाई केली. अमेरिकेतील रोजगाराची कमकुवत आकडेवारी समोर आल्यानंतर, जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता वाढली आहे. या अपेक्षेने जागतिक बाजारासह भारतीय गुंतवणूकदारांचाही आत्मविश्वास वाढवला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोणत्या कंपन्या ठरल्या ‘टॉप गेनर्स’?
बाजार मूल्यात झालेल्या वाढीचा सर्वाधिक फायदा भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स या कंपन्यांना झाला. त्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे कंपन्यांच्या एकूण मूल्यात मोठी भर पडली.
देशातील सर्वात मौल्यवान टॉप-१० कंपन्यांची क्रमवारी
सध्याच्या बाजार मूल्यानुसार देशातील आघाडीच्या १० कंपन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
१. रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी
२. एचडीएफसी बँक
३. भारती एअरटेल
४. आयसीआयसीआय बँक
५. स्टेट बँक ऑफ इंडिया
६. टीसीएस
७. बजाज फायनान्स
८. लार्सन अँड टुब्रो
९. एलआयसी
१०. हिंदुस्तान युनिलिव्हर
