मुंबई : ‘झुडिओ’ आणि ‘वेस्टसाईड’ सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सची पालक कंपनी असलेल्या टाटा समूहाच्या ‘ट्रेंट लिमिटेड’ने आपल्या इतिहासातील पहिल्या वहिल्या बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनीने १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे निश्चित केले असून, त्यासाठी ४ जून २०२६ (गुरुवार) ही ‘रेकॉर्ड डेट’ जाहीर केली आहे.

भारतीय शेअर बाजारातील समभागांच्या खरेदी-विक्रीसाठी लागू असलेल्या ‘टी+१’ सेटलमेंट नियमानुसार, जे गुंतवणूकदार आज, बुधवार ३ जून रोजी बाजाराच्या व्यवहारादरम्यान ट्रेंटचे शेअर्स खरेदी करतील, त्यांच्याच डिमॅट खात्यात गुरुवारपर्यंत शेअर्स जमा होतील. त्यामुळे बोनस शेअर्सचा लाभ मिळवण्यासाठी आज खरेदीची अंतिम संधी असणार आहे.

बोनसचे गणित आणि लाभांश 

बोनसचे प्रमाण : १:२ (म्हणजेच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक २ शेअर्सवर १ बोनस शेअर मोफत मिळेल).

रेकॉर्ड डेट : ४ जून २०२६ (गुरुवार).

अपेक्षित वाटप तारीख : २१ जून २०२६ पर्यंत बोनस शेअर्सचे वाटप पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

शेअर्सची संख्या वाढणार: या कॉर्पोरेट ॲक्शनअंतर्गत कंपनी १ रुपया दर्शनी मूल्य असलेले सुमारे १७.७७ कोटी नवीन समभाग बाजारात जारी करणार आहे.

अतिरिक्त लाभांश: बोनस शेअर्ससोबतच कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी ६ रुपये प्रति शेअर लाभांश देखील जाहीर केला आहे.

फक्त बोनससाठी शेअर खरेदी करावा का? तज्ज्ञांचा सल्ला काय

अनेकदा सामान्य गुंतवणूकदार केवळ बोनस शेअर्स मिळवण्याच्या मोहाने शेअर खरेदी करतात. मात्र, ‘इन्व्हेसेट पीएमएस’चे बिझनेस हेड हर्षल दसाणी यांच्या मते, केवळ बोनससाठी शेअर खरेदी करणे हा चुकीचा गुंतवणूक दृष्टिकोन आहे. बोनस शेअर्समुळे कंपनीच्या एकूण मूल्यामध्ये किंवा व्यवसायात कोणताही फरक पडत नाही. बोनस मिळाल्यानंतर शेअर्सची संख्या वाढते आणि त्याच प्रमाणात शेअरची बाजारातील किंमत कमी होते. गुंतवणूकदारांनी बोनसकडे न पाहता कंपनीची कामगिरी आणि भविष्यातील नफा कमावण्याची क्षमता तपासावी. ट्रेंट ही देशांतर्गत किरकोळ बाजारपेठेतील एक मजबूत कंपनी आहे; परंतु सध्याच्या किंमतीत भविष्यातील वाढ आधीच गृहीत धरली गेली आहे, त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी मूल्यांकनाचा विचार करूनच सावधपणे निर्णय घ्यावा.

गुंतवणूकदारांना मालामाल केले

गेल्या एका वर्षात ट्रेंटच्या शेअरमध्ये काहीशी घसरण (सुमारे २५ टक्के) झाली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या समभागाने बंपर परतावा दिला आहे. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, गेल्या ३ वर्षांत या शेअरने १६४ टक्क्यांहून अधिक, तर गेल्या ५ वर्षांत तब्बल ३९३ टक्क्यांचा प्रचंड परतावा दिला आहे. टाटा सन्सची  या कंपनीत ३२ टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे.