अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी अनेक प्रमुख तंत्रज्ञान आणि आयटी आउटसोर्सिंग कंपन्यांना अमेरिकी सरकारच्या ‘पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम’ (पीईआरएम) प्रक्रियेतून वगळले आहे. कॉग्निझंट, इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल, कॅपजेमिनी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब या सारख्या कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘पीईआरएम’ ही एच-१ बी व्हिसाधारकांसह परदेशी कर्मचाऱ्यांना रोजगार आधारित ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि अमेरिकेच्या घोटाळाविरोधी कृती दलाच्या प्रमुखांसह अमेरिकेचे कामगारमंत्री कीथ साँडरलिंग यांनी गुरुवारी यासंबंधी घोषणा केली. कारवाई करण्यात आलेल्या कंपन्या रोजगारासाठी असलेल्या व्हिसा योजनेचा गैरवापर करतात आणि अमेरिकी कर्मचाऱ्यांकडून नोकऱ्या हिरावून घेतात, असा आरोप साँडरलिंग यांनी केला आहे.

व्हान्स यांनी मायक्रोसॉफ्टला पीईआरएममधून वगळण्याची घोषणा करताना त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “सध्या सुरू असलेल्या तपासानंतर आम्ही मायक्रोसॉफ्टला पीईआरएममधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ त्यांना यापुढे एच-१ बी व्हिसा घेता येणार नाही आणि अमेरिकेत कायमस्वरूपी रहिवासी दर्जासाठी (ग्रीन कार्ड) अर्ज करता येणार नाही. आमचा मायक्रोसॉफ्ट आणि इतर परदेशी वा स्थानिक कंपन्यांना अगदी साधा संदेश आहे. तुम्ही महान अमेरिकी कंपनी आहात, पण तुम्हाला महान अमेरिकी कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल. तुम्ही अमेरिकी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करून त्यांच्याजागी परदेशी कंत्राटी सेवकांची भरती करू शकत नाही.”

साँडरलिंग म्हणाले की, “२००९ पासून या कंपन्यांनी जवळपास ३० लाख परदेशी कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यांनी २ लाख ३० हजार एच-१ बी व्हिसा आणि एक लाखापेक्षा जास्त ग्रीन कार्ड घेतली आहेत. या लाखो कर्मचाऱ्यांनी अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत.”

तुम्ही अमेरिकेत भरभराट करावी अशी आमची इच्छा आहे. लोकांनी अमेरिकेत, विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करावी अशी आमची इच्छा आहे. तुमच्या उद्योगाला आमच्याकडून सर्वाधिक प्रोत्साहन मिळते. तुमची वाढ व्हावी आणि तुम्ही भरपूर लोकांना रोजगार दयावा अशी आमची इच्छा आहे, पण तुम्ही अमेरिकी कर्मचाऱ्यांना नोकरी दयावी अशी आमची इच्छा आहे. – जे.डी. व्हान्स, उपाध्यक्ष, अमेरिका

ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावर भारताची तिखट प्रतिक्रिया

ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली. पीईआरएम अर्जांच्या निलंबनामुळे सध्याच्या H-1B व्हिसाच्या वैधतेवर किंवा H-1B व्हिसा धारक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दर्जावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केलं. तसेच कुशल लोकांची देवाणघेवाण दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरते. मात्र, अशा निर्णयांमुळे दोन्ही देशांचे नुकसान होईल. तसेच जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्यावरही भारताने कडक शब्दांत आक्षेप घेतला.