Uday Kotak on rupee at 90: डॉलरच्या तुलनेत रुपयाची आज विक्रमी घसरण झाली. पहिल्यांदाच रुपयाने ९० रुपयांची पातळी ओलांडली. यानंतर भारतातील दिग्गज बँकर उदय कोटक यांनी यावर भाष्य केले आहे. भारतीय शेअर बाजारातून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत, हे रुपयाची घसरण होण्यामागे एक कारण असल्याचे उदय कोटक म्हणाले. विदेशी गुंतवणूकदार एका बाजूला शेअर बाजारातून पैसा काढून घेण्याची चलाखी करत असताना भारतीय गुंतवणूकदार मात्र खरेदीवर जोर देत आहेत, असेही उदय कोटक म्हणाले.
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक असलेले उदय कोटक यांनी आज एक्सवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, डॉलरच्या तुलनेत रुपया ९० रुपयांच्या पातळीवर पोहोचल्यानंतर भारतीय व्यावसायांनी आता या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहायला हवे. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावेच लागेल.
उदय कोटक यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, रुपया ९० वर पोहोचला. विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसा काढून घेत आहेत. मग तो FDI असो किंवा FPI द्वारे गुंतवलेला पैसा असो. भारतीय गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. कोण किती हुशार आहे, हे वेळच सांगेल. पण सध्याच्या घडीला विदेशी गुंतवणूकदार अधिक हुशार वाटत आहेत. आता ही मोठी लढाई आहे. आता भारतीय उद्योगाने कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावे लागेल.
यावर्षी ५ टक्क्यांची घसरण
चालू वर्षात रुपया डॉलरच्या तुलनेत जवळपास ५ टक्क्यांनी घसरला आहे. डॉलर इंडेक्सही ८.५ टक्क्यांनी घसरला आहे, हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले जाते. शिवाय यावर्षी आशियातून सर्वात खराब कामगिरी करणाऱ्यांमध्ये भारतीय चलनाचा समावेश झाला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी यावर्षी भारतीय शेअर बाजारातून जवळपास १७ अब्ज डॉलरची विक्री केली आहे. पोर्टफोलियो गुंतवणुकीत मरगळ आली असतानाच एफडीआयमध्येही उदासीनता दिसून येत आहे. यामुळे रुपयावर आणखी दबाव दिसून आला.
दरम्यान रुपया स्थिर करण्यासाठी आरबीआयने अधेमधे हस्तक्षेप केला होता. मात्र डॉलरची मागणी सतत वाढत चालली आहे, असे बँकर्सचे म्हणणे आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. ज्यामुळे रुपयावर दबाव वाढत आहे.
