Unclaimed PF Money Withdrawal : अनेकदा नोकरी बदलल्यानंतर किंवा सोडल्यानंतर जुन्या पीएफ (PF) खात्यातील पैसे काढणे राहून जाते. एलआयसीच्या पॉलिसीही बऱ्याचदा लोक विसरुन जातात. मात्र, आता हे पैसे काढण्यासाठी सरकार तुमची मदत करणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या दोन संस्थांकडे नागरिकांचे तब्बल १६,६४९.०६ कोटी रुपये दाव्याविना पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक ९,३३०.५६ कोटी रुपये एकट्या ईपीएफओ संस्थेकडे आहेत. तुमचेही यात पैसे असतील तर तुम्ही ते सहज मिळवू शकता.

वापरात नसलेल्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम

  • तुमचे पीएफ खाते २ महिन्यांपेक्षा जास्त दिवस अकार्यक्षम (Inactive) असल्या तुम्ही पूर्ण रक्कम काढू शकता. यापेक्षा कमी कालावधी असल्यास अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे.
  • तुमच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबरशी (UAN) पॅन, आधार आणि बँक खात्याचा तपशील जोडलेला असणे आवश्यक आहे.
  • जर पीएफ खाते ७ वर्षांपेक्षा जास्त काळ इनऑपरेटिव्ह असेल, तर क्लेमसाठी अतिरिक्त कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
  • पीएफ खात्याचा कालावधी आणि सेवा कालावधीनुसार काढलेल्या रक्कमेवर प्राप्तिकर लागू होतो.

‘इनऑपरेटिव्ह’ पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे कसे काढावे?

  • ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटला (epfindia.gov.in) भेट द्या. Our Services या विभागात जाऊन For Employees या पर्यायावर क्लिक करा.
  • सेवांच्या सूचीमधून Claim Form किंवा पोर्टलवरील Member Services पर्याय निवडा.
  • पूर्ण पीएफ काढण्यासाठी Form 19 भरा. जर तुम्हाला पेन्शनची रक्कम काढायची असेल तर Form 10C निवडा.
  • तुमचा UAN नंबर, जुना पीएफ अकाऊंट नंबर आणि केवायसी तपशील भरा. युएएन लॉगिन क्रेडेंशियल्स आणि ओटीपीचा वापर करून फॉर्म डिजीटलरीत्या सबमिट करा.

युएएन (UAN) नंबर नसेल तर पैसे कसे काढायचे?

  • ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावरून Form 19 किंवा Form 10C डाऊनलोड करा.
  • फॉर्म हाताने संपूर्णपणे भरा.
  • अर्जासोबत आवश्यक केवायसी कागदपत्रे जोडून तो तुमच्या जवळच्या ईपीएफओ प्रादेशिक कार्यालयात जमा करा.

तुमच्या क्लेमचे स्टेटस कसे तपासावे?

  • ईपीएफओ पोर्टलवर Online Services मध्ये जा.
  • For Employees विभागात असलेल्या Track Claim Status वर क्लिक करा.
  • तुमचा पीएफ अकाऊंट नंबर आणि UAN भरुन करून Search वर क्लिक करा.
  • तुमचा क्लेम मंजूर झाला आहे, प्रलंबित आहे की फेटाळला गेला आहे, याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

नोकरी बदलल्यानंतर जुन्या पीएफ खात्यातील रक्कम नवीन UAN मध्ये ट्रान्सफर करणे किंवा ती काढून घेणे हाच योग्य निर्णय आहे. इनऑपरेटिव्ह खात्यांवर ठराविक कालावधीनंतर व्याज मिळणे बंद होते.