Union Bank Of India And Bank Of India Merger News: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुरुवातीची विलीनीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सध्या दोन्ही बँका प्रक्रियेचे अंतर्गत मूल्यांकन आणि कार्यात्मक एकत्रीकरणासह योग्य ती तपासणी करत आहेत. काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विलीनीकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते.

घडामोडींची माहिती असलेल्या एका वरिष्ठ बँकिंग अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “सध्याच्या १२ बँकांऐवजी चार ते पाच मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका तयार करण्यासाठी सरकार लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यास उत्सुक आहे.” याबाबत फायनान्शियल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

या विलीनीकरणामुळे देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदात्यांपैकी एक बँक तयार होईल, जिचा ताळेबंद, शाखांचे जाळे आणि ग्राहकवर्ग लक्षणीयरीत्या विस्तारलेला असेल. ही विलीन झालेली बँक आर्थिक वर्ष २५ मध्ये सुमारे २५.४ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया व एचडीएफसी बँकेनंतर एकूण तिसरी सर्वात मोठी बँक बनेल.

बाजार भांडवलाच्या बाबतीत, विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक सध्याच्या किमतीनुसार सुमारे २.१३ लाख कोटी रुपयांसह सहाव्या क्रमांकावर येईल आणि बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक व पंजाब नॅशनल बँकेला मागे टाकेल. सध्या युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया अनुक्रमे पाचवी आणि सहावी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.

प्रस्तावित विलीनीकरण हे २०१७ ते २०२० दरम्यान सरकारच्या महा-विलीनीकरण मोहिमेनंतर होत आहे. या कालावधीत १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे चार मोठ्या संस्थांमध्ये विलीनीकरण करण्यात आले, ज्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७ वरून १२ पर्यंत कमी झाली.

तेव्हापासून धोरणकर्त्यांनी भारताची वाढती कर्जाची मागणी पूर्ण करण्यासाठी, मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिस्पर्धकांशी अधिक प्रभावीपणे स्पर्धा करण्यास सक्षम असलेल्या, कमी परंतु अधिक मजबूत बँकांची निर्मिती करण्याच्या गरजेवर वारंवार जोर दिला आहे.