मुंबई : सलग तीन आठवडे मुख्य मंचावर आयपीओ बाजारात शांतता राहिल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्राथमिक बाजारात पुन्हा हालचाल वाढणार आहे. १ ते ५ जूनदरम्यान एकूण पाच कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होणार असून, त्यातून ९०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी सुमारे ७७० कोटी रुपयांची उभारणी मेनबोर्ड विभागातून होणार आहे.

या आठवड्यातील सर्वात मोठा आयपीओ धातू पुनर्प्रक्रिया क्षेत्रातील सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज या कंपनीचा असेल. कंपनीचा ६३१ कोटी रुपयांचा आयपीओ ३ जूनपासून खुला होणार आहे. ३.२८ कोटी समभागांच्या विक्री प्रस्तावाद्वारे (ऑफर फॉर सेल) हा निधी उभारला जाणार असून, समभागाची किंमत १८२ ते १९२ रुपये निश्चित करण्यात आली आहे.

यानंतर पोषणविषयक संशोधनाधारित उत्पादने विकसित करणारी हेक्सागॉन न्यूट्रिशन ही संशोधन क्षेत्रातील ही पोषण आहार कंपनी ५ जून रोजी आपला आयपीओ घेऊन येत आहे. कंपनी ३.०८ कोटी शेअर्सच्या माध्यमातून सुमारे १३९ कोटी रुपये उभारणार आहे. प्रवर्तकांद्वारे (Promoters) आणला जाणारा हा देखील पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ असून, प्रति शेअर ४२ ते ४५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे.

एसएमई विभागातही तीन आयपीओ

मुख्य प्रवाहाबरोबरच एसएमई विभागातही तीन कंपन्या बाजारात उतरत आहेत. इलेक्ट्रॉनिक सिस्टिम डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील मेरीट्रॉनिक्स हिचा ७० कोटी रुपयांचा आयपीओ सोमवारपासून खुला झाला आहे. या समभागासाठी किंमतपट्टा १४१ ते १४९ रुपये ठेवण्यात आला आहे.

रासायनिक क्षेत्रातील वाह केमिकल्स कंपनीचा आयपीओ ४ जूनपासून खुला होणार आहे. २२.४२ लाख समभागांच्या विक्रीद्वारे कंपनी १३.४५ कोटी रुपये उभारणार असून, समभागाची निश्चित किंमत ६० रुपये आहे.

तर एंटरप्राइझ अॅनालिटिक्स आणि परफॉर्मन्स सोल्यूशन्स पुरवणारी . जेनक्सएआय अ‍ॅनालिटिक्स कंपनी ४७.२८ लाख समभागांच्या माध्यमातून ५४.८ कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. या समभागासाठी किंमतपट्टा ११० ते ११६ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

सुरू असलेल्या आयपीओंकडेही लक्ष

दरम्यान, ‘ऑरेट ट्रेड’चा २७ कोटी रुपयांचा एसएमई आयपीओ २ जून रोजी बंद होईल, तर ‘एसएमआर ज्वेल्स’ने ६४ कोटींच्या आयपीओची मुदत ३ जूनपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत या दोन्ही आयपीओंना अनुक्रमे १५ टक्के आणि ४२ टक्के सबस्क्रिप्शन मिळाले आहे. भागभांडवल बाजारातील नोंदणीचा विचार केल्यास, ‘एम आर मणिवेणी फूड्स’ने १ जून रोजी बीएसई एसएमई मंचावर पदार्पण केले आहे. यानंतर २ जून रोजी ‘याशवी ज्वेलर्स’ आणि ३ जून रोजी ‘राजनंदिनी फॅशन इंडिया’चे शेअर्स बाजारात सूचिबद्ध होतील. प्राथमिक बाजारातील ही वाढती हालचाल गुंतवणूकदारांचा उत्साह कायम असल्याचे संकेत देत असून, जून महिन्याची सुरुवात आयपीओ बाजारासाठी सकारात्मक ठरताना दिसत आहे.