मुंबई :  आगामी आठवड्यात प्राथमिक बाजारात मोठी धामधूम पाहायला मिळणार असून सात कंपन्या मिळून ६,४०० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याच्या तयारीत आहेत. यात ब्लॅकस्टोन-समर्थित ‘हॉरिझॉन इंडस्ट्रियल पार्क’ आणि ‘ललिता ज्वेलरी मार्ट’ यांसारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. चालू महिन्यात याआधीच आठ कंपन्यांनी बाजारात प्रवेश केला असून, आगामी आठवड्यातील आयपीओमुळे २०२६ मध्ये सार्वजनिक भागविक्री आणणाऱ्या कंपन्यांची एकूण संख्या ५५ वर पोहोचण्याची शक्यता उद्योग जगतातील आकडेवारीवरून व्यक्त होत आहे. या सार्वजनिक भागविक्रीतून मिळणारा बहुतांश निधी हा व्यवसाय विस्तार, भांडवली खर्च, कर्जाची परतफेड आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी वापरला जाईल, तर ओएफएसद्वारे जमा होणारी रक्कम भागविक्री करणाऱ्या विद्यमान भागधारकांना मिळेल.

आठवड्याची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी हॉरिझॉन इंडस्ट्रियल पार्कच्या २,६०० कोटी रुपयांच्या आणि ललिता ज्वेलरी मार्टच्या १,७०० कोटी रुपयांच्या आयपीओने होणार आहे. हॉरिझॉनने प्रति शेअर ५७-६० रुपये, तर ललिता ज्वेलरीने १९०-२०१ रुपये असा प्राईस बँड निश्चित केला आहे. यानंतर १८ ऑगस्ट रोजी शंकेश ज्वेलर्स (३६७ कोटी रुपये, प्राईस बँड रु. ८८-९३) आणि चित्रपट व टीव्ही निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि शेफली विपुल शाह यांची सनशाईन पिक्चर्स (२८२ कोटी रुपये, प्राईस बँड रु. ३४२-३६०) आपले आयपीओ खुले करतील.

आठवड्याच्या उत्तरार्धात, १९ ऑगस्ट रोजी गाजा कॅपिटल ब्रँडची ‘गाजा अल्टरनेटिव्ह ॲसेट मॅनेजमेंट’ (५५० कोटी रुपये, प्राईस बँड रु. १५२-१६०) बाजारात उतरेल. त्यानंतर २० ऑगस्टला ‘टॅम्पसेन्स इन्स्ट्रुमेंट्स’ आणि २१ ऑगस्टला ‘ऑग्मॉन्ट एंटरप्रायझेस’ (८२५ कोटी रुपये) यांचे आयपीओ बाजारात सादर होतील; या दोन्ही कंपन्यांचा प्राईस बँड अनुक्रमे सोमवार आणि मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, प्राथमिक बाजारातील ही गती पुढील आठवड्यातही कायम राहणार असून, २४ ऑगस्ट रोजी ‘स्कायवेज एअर सर्व्हिसेस’ ही लॉजिस्टिक कंपनी ५८३ कोटी रुपयांचा आयपीओ सादर करणार आहे. ऑग्मॉन्ट एंटरप्रायझेसचा ८२५ कोटी रुपयांचा आयपीओ २१ ऑगस्टपासून खुला होणार सोने-चांदी क्षेत्रातील प्रमुख ‘ऑग्मॉन्ट एंटरप्रायझेस लिमिटेड’ ही कंपनी  आयपीओ बाजारात आणत आहे.  

आयपीओची माहिती:

एकूण आयपीओ आकार: ८२५ कोटी
नवीन शेअर्स : ६२० कोटी
ओएफएस: २०५ कोटी
आयपीओ सुरू होण्याची तारीख: शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
आयपीओ बंद होण्याची तारीख: मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६

ऑग्मॉन्ट एंटरप्रायझेस ही भारतातील सोने आणि चांदीच्या व्यापारातील एक मोठी एकात्मिक कंपनी आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत ही कंपनी भारतातील २४ राज्यांमध्ये कार्यरत आहे. कंपनी सोने-चांदीचे शुद्धीकरण, बुलियन ट्रेडिंग, डिजिटल गोल्ड, दागिन्यांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय विक्री आणि सोन्यावर आधारित आर्थिक सेवा पुरवण्याचे काम करते.