Pan Shop Digital Payment Growth: भारतात गेल्या काही वर्षांपासून यूपीआय पेमेंट्सचा वापर वाढत चालला आहे. लोक छोट्या-छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात यूपीआय पेमेंट्सचा वापर करत आहेत. अशातच आता समोर आले आहे की, यूपीआय पेमेंट्सचा देशात सर्वाधिक दैनंदिन वापर पानटपऱ्यांवर तंबाखू, सिगारेट आणि पान मसाल्यांच्या खरेदीसाठी होत आहेत.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान देशातील यूपीआय पेमेंट्सचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. यूपीआय पेमेंट्साचा किराणा दुकाने, पेट्रोल पंप, फास्ट-फूड सेंटर्स आणि ऑनलाइन फूड मागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. किराणा दुकानांमध्ये होणाऱ्या यूपीआय पेमेंट्समध्ये १.२७ अब्जवरून ३.२ अब्जपर्यंत वाढ झाली आहे.

भारतीय लोक यूपीआय पेमेंट्सना प्राधान्य देत असताना, पानटपऱ्यांवर होणाऱ्या यूपीआय पेमेंट्समध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये पानटपऱ्यांवर केवळ ०.६६ टक्के यूपीआय पेमेंट्स होत होते, ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत २.७६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

जे लहान व्यवहार एकेकाळी जवळजवळ पूर्णपणे रोखीने होत असत, त्यांच्यासाठी यूपीआय आता व्यवहाराचे प्रमुख माध्यम बनत आहे. हाच कल इतर लहान-मोठ्या ऐच्छिक खरेदीच्या क्षेत्रांमध्येही दिसून येत आहे. बिअर आणि दारूची दुकाने, मिठाई विक्रेते, केशकर्तनालये आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये गेल्या काही महिन्यांत यूपीआय पेमेंट्सचा वापर वाढलेला दिसून आला आहे.

२०२३ आणि २०२४ च्या सुरुवातीला पानटपऱ्यांचा यूपीआय व्यवहारांमधील वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी होता. मात्र सप्टेंबर २०२४ च्या सुमारास वापर वाढू लागला आणि त्यानंतर हा वाटा २ टक्क्यांवरून २.७६ टक्क्यांपर्यंत वाढला.

  • यूपीआयद्वारे भारतातील यूपीआय पेमेंट्समध्ये झालेल्या वेगवान वाढीमुळे पानटपऱ्या अनपेक्षितपणे लाभार्थी ठरल्या आहेत.
  • नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान पानटपऱ्यांवरील यूपीआय व्यवहारांचे प्रमाण तब्बल आठ पटींनी वाढले आहे.
  • याच कालावधीत एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये पानटपऱ्यांचा वाटा ०.६६ टक्क्यांवरून २.७६ टक्क्यांपर्यंत चौपट झाला आहे.
  • किराणा आणि फास्ट-फूडच्या वाढत्या मागणीमुळे एकूण यूपीआय व्यवहारांचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे.