UPI Transaction Peak Hours Friday Evening: सुपर मनी या यूपीआय अॅपच्या अहवालातून भारतीय तरुणांच्या खर्चाच्या सवयींबाबत नवी माहिती समोर आहे आहे. यामध्ये आजची ‘जेन झेड’ पैशांचे व्यवस्थापन कसे करते, याचे चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या लाखो यूपीआय व्यवहारांवर आधारित या अभ्यासातून असे दिसून येते की, डिजिटल पेमेंट, लहान-सहान खरेदी आणि सावधपणे क्रेडिट कार्डचा वापर या गोष्टी आता देशभरातील तरुणांच्या आर्थिक जीवनशैलीचा भाग बनल्या आहेत. याचबरोबर अहवालातून देशात दर आठवड्याला शुक्रवारी संध्याकाळी ७-८ या वेळेत सर्वाधिक यूपीआय व्यवहार का होतात याचे कारणही समोर आहे.
तरुणांच्या बदलत्या आर्थिक वर्तनाचे चित्र
सुपर मनीच्या जवळपास ७२ टक्के युजर्सचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असल्याने, या अहवालातू मेट्रो शहरे आणि लहान शहरांमधील तरुणांच्या बदलत्या आर्थिक वर्तनाचे एक अचूक चित्र समोर आले आहे.
तरुण युजर्सची डिजिटल पेमेंट ही एक सवय बनली आहे. अहवालानुसार, त्यांच्यापैकी ७४ टक्के लोक दरमहा ५० पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट करतात आणि या ७४ टक्के युजर्सपैकी सर्वाधिक युजर्स दरमहा २०० पेक्षा जास्त यूपीआय व्यवहार करतात.
खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी, कॅब बुक करण्यासाठी किंवा एकत्रित बिल वाटून घेण्यासाठी क्यूआर कोड्स आता तरुणांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत.
सुपर मनीच्या या अहवालातील सर्वात महत्त्वाच्या निष्कर्षांपैकी एक म्हणजे, जवळपास ७६ टक्के व्यवहार २०० रुपयांपेक्षा कमी रकमेचे असतात, जे लहान-सहान खरेदी, किराणा सामान आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंसाठी केले जातात.
दिवसभरातील डिजिटल पेमेंटचा कल
हा अहवाल दिवसभरातील डिजिटल पेमेंटचा कल दर्शवतो. मध्यरात्री ते सकाळी ६ वाजेपर्यंत खाद्यपदार्थांच्या ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, कारण तरुणांच्या रात्री उशिरा जागण्याच्या सवयीमुळे खाण्याच्या वेळाही बदलल्या आहेत.
याचबरोबर सकाळी ६ ते ११ या वेळेत किराणा आणि सुपरमार्केटमधील खरेदीचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रमुख शहरांमध्ये, किराणा खरेदीमुळे सकाळी ६ ते ११ या वेळेत सर्वाधिक व्यवहार होतात. हे प्रमाण जवळच्या दुकानांमध्ये त्वरित जाऊन खरेदी करणे आणि डिजिटल पेमेंट प्राधान्य देण्याच्या कलामुळे वाढले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत सर्वाधिक यूपीआय व्यवहार
दरम्यान देशभरात शुक्रवार संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत दर आठवड्याला सर्वाधिक यूपीआय व्यवहार होतात. कारण तरुण युजर्स आठवडाभर काम केल्यानंतर शनिवार-रविवार अशा सुट्यांच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थ, मौज-मजा आणि छोट्या-छोट्या सुखांचा आनंद घेत असतात, असे अहवालात म्हटले आहे.
