Rupee Falls Below 90: भारत-अमेरिका यांच्यातील रखडलेला व्यापार करार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून होत असलेली सततची इक्विटी विक्री आणि अमेरिकन चलनाचा कमकुवत पुरवठा यामुळे भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया ९० पर्यंत घसरला असून, तो ९०.१६ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचबरोबर चालू वर्षात भारतीय रुपयामध्ये सुमारे ४.४ टक्क्यांची घसरण झाली आहे.

“भारत-अमेरिका व्यापार कराराच्या अनिश्चिततेमुळे बाजारातील भावना नाजूक आहेत. शेअर बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा प्रवाह आणि गुंतवणूकदार जपानी येन ट्रेड कॅरी करण्यापासून परावृत्त होत असल्याने रुपयावर दबाव येत आहे”, असे कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांनी सांगितले.

भारतीय शेअर बाजारातून २०२५ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली जात आहे. या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १.४८ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. तर डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसांत, त्यांनी ४,३३५ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत, ज्यामुळे रुपयावर दबाव आला आहे.

“आरबीआयने सातत्याने सांगितले आहे की, त्यांचे लक्ष रुपयाच्या अस्थिरतेचे व्यवस्थापन करण्यावर आहे. ते बाजारात हस्तक्षेप करत आहे परंतु कोणत्याही दर पातळीचे समर्थन करत नाहीत”, असे एका विश्लेषकाने सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

दरम्यान आणखी काही महिने भारतीय रुपया कमकुवत राहण्याची शक्यता आहे. पण, अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत सकारात्मक हालचाली घडल्यास रुपया सावरण्याची शक्यता आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्यात बैठकीला आजपासून (३ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. ही बैठक ५ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. त्यामुळे चलन स्थिर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हस्तक्षेप करणार आहे की नाही याबद्दल बाजाराला स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे, असे एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सीचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी म्हटले आहे.

“सध्या बाजारात रुपया ९१ ची पातळी गाठेल अशी चर्चा आहे. रिझर्व्ह बँकच्या बैठकीनंतर त्यामध्ये सुधारणा होऊन रुपया ८८-८९ ची पातळी गाठेल अशी आम्हाला आशा आहे. पण या सर्व आशा आहे. रुपयाने ८८ चा टप्पा ओलांडल्यापासून आम्ही अशी आशा व्यक्त करत आहोत”, असे बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले.