US Iran Israel War Impact On Gold Prices: मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. या वातावरणात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहेत. म्हणूनच आज सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भू-राजकीय तणाव वाढत असताना आणि आर्थिक अस्थिरतेची भीती वाढत असताना स्पॉट गोल्ड सुमारे दोन टक्क्यांनी वाढून ५,३६८.०९ प्रति औंसवर पोहोचले आहे. सोन्याच्या किमतीतील ही चार आठवड्यांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळी आहे. तसेच चांदीचे दरही वाढत आहेत.
दुसरीकडे, आशियातील तेल बाजारांनी आठवड्याची सुरुवात तेजीने केली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांमुळे गुंतवणूकदारांनी जागतिक ऊर्जा पुरवठ्यात मोठा व्यत्यय येण्याच्या शक्यतेवर त्वरित प्रतिक्रिया दिली आणि सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या.
लष्करी संघर्षाचा परिणाम
अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर रविवारी रात्री उशिरा जागतिक शेअर बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर सोने, चांदी आणि तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली.
जगातील सर्वात मोठा तेल ग्राहक अमेरिका आणि ओपेकच्या प्रमुख उत्पादक देशांपैकी एक असलेल्या इराण यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना आधीच वाटत होती. आता कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये भू-राजकीय जोखीमीचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.
सोन्याबद्दल तज्ज्ञांचे मत
एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी रिसर्च अॅनालिस्ट जतिन त्रिवेदी यांच्या मते, मध्य पूर्वेत अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई केल्याने जागतिक बाजारपेठेत चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यात तीव्र चढ-उतार दिसून येतील.
ते म्हणाले की, सतत हल्ले आणि प्रत्युत्तरामुळे अनिश्चितता वाढली आहे आणि लवकरात लवकर राजनैतिक तोडगा निघण्याची आशा सध्या मंदावलेली दिसते. अशा वाढत्या भू-राजकीय जोखमीमुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायांकडे, म्हणजेच सोने आणि चांदीतील गुंतवणुकीकडे कल वाढत आहे.
…तर सोने आणि चांदीत प्रॉफिट-बुकिंग दिसू शकते
पण त्रिवेदी असा इशारा देखील देतात की त्याचा परिणाम एकतर्फी होणार नाही. जर आठवड्याच्या शेवटी राजनैतिक पुढाकार किंवा तणाव कमी होण्याची चिन्हे दिसली, तर सुरुवातीच्या ३ ते ६ टक्के वाढीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत प्रॉफिट-बुकिंग दिसू शकते.
