Crude Oil May Cross 100 Dollars Per Barrel Amid US Israel Iran Conflict: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक लवकर पूर्ववत झाली नाही तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सपेक्षा जास्त होऊ शकतात, कारण जलमार्ग बंद झाल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यात १५ टक्के आणि जागतिक एलएनजी पुरवठ्यात २० टक्के व्यत्यय येण्याचा धोका आहे, असे वुड मॅकेन्झी या सल्लागार आणि संशोधन कंपनीने सांगितले आहे.
वुड मॅकेन्झी ही एक आघाडीची जागतिक संशोधन आणि सल्लागार कंपनी आहे जी ऊर्जा, अक्षय ऊर्जा, रसायने, धातू आणि खाण उद्योगांसाठी माहिती आणि विश्लेषण सेवा पुरवते.
इराणच्या सरकार, लष्कर आणि आण्विक सुविधांवर अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांनंतर इराणने सामुद्रधुनीतून तेल जहाजांची वाहतूक थांबवण्याचा इशारा दिला आहे. तसेच विमा कंपन्यांनी विमा संरक्षण काढून घेतल्यामुळे तेल जहाजांची वाहतूक प्रभावीपणे थांबली आहे.
वुड मॅकेन्झीच्या मते, या व्यत्ययामुळे पुरवठ्याचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. सामुद्रधुनीतून होणारी सध्याची निर्यात स्थगित झाली आहे, तर दुसरीकडे OPEC+ चा अतिरिक्त साठा आणि OPEC ची बहुतांश राखीव क्षमता, जी सहसा जागतिक तेल बाजाराचा समतोल राखण्यासाठी वापरली जाते, ती हा जलमार्ग बंद राहील तोपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही.
होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ किमान तीन जहाजांवर हल्ले झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ८ टक्क्यांहून अधिक वाढून ७८.७२ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले आहे, तर अमेरिकन बाजारपेठेत व्यापार होणारे तेल ७.६ टक्क्यांनी वाढून ७२.२० डॉलर्सवर पोहोचले आहे.
वुड मॅकेन्झीमधील रिफायनिंग, केमिकल्स आणि ऑइल मार्केट्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲलन गेल्डर म्हणाले की, अत्यंत सकारात्मक परिस्थितीतही निर्यातीचा ओघ पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. या काळात तेलाच्या किमतीत “मोठी वाढ होण्याचा धोका” सर्वाधिक आहे. त्यांनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या सुरुवातीच्या काळाचा दाखला दिला, जेव्हा रशियाकडून होणारा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीपोटी तेलाच्या किमती प्रति बॅरल १२५ अमेरिकन डॉलर्सच्या वर गेल्या होत्या.
“सध्याच्या परिस्थितीत, जर वाहतूक लवकर पूर्ववत झाली नाही, तर तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या वर जाण्याची शक्यता आहे”, असे ते म्हणाले.
भारत आपल्या गरजेच्या ८८% कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या किमतीत होणाऱ्या कोणत्याही वाढीमुळे भारताचे आयात बिल तर वाढेलच, शिवाय इंधन दरवाढीमुळे महागाईतही मोठी भर पडेल.
