scorecardresearch

वंदे भारत ट्रेन आता ‘स्वर्गा’पर्यंत धावणार, आयफेल टॉवरपेक्षा उंच पूल तयार, रेल्वेमंत्र्यांकडून प्रवासाचा व्हिडीओ शेअर

काश्मीर हे पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणूनही ओळखले जाते. तिथे खराब हवामानामुळे बऱ्याचदा रस्ते आणि हवाई मार्ग बंद होतात, त्यामुळे अनेक वेळा देशाच्या इतर भागांशी काश्मीरचा संपर्क तुटतो

Udhampur Srinagar Baramulla Rail Link Project
Udhampur Srinagar Baramulla Rail Link Project

पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणजे काश्मीरला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. बऱ्याचदा प्रवासात कधी हवामान तर कधी अतिरेकी अडसर ठरतात. परंतु भारतीय रेल्वेने जम्मू-काश्मीरच्या प्रवासात आता कोणताही अडथळा येणार नाही हा पराक्रम करून दाखवला आहे. वर्षाच्या अखेरीस वंदे भारत ट्रेन (जम्मू-श्रीनगर वंदे भारत) थेट जम्मू ते श्रीनगर धावणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील जवळजवळ तयार असल्याचं सांगितलं आहे.

काश्मीर हे पृथ्वीवरचे स्वर्ग म्हणूनही ओळखले जाते. तिथे खराब हवामानामुळे बऱ्याचदा रस्ते आणि हवाई मार्ग बंद होतात, त्यामुळे अनेक वेळा देशाच्या इतर भागांशी काश्मीरचा संपर्क तुटतो. भारतीय रेल्वे आता हे आव्हान पेलण्यासाठी जम्मू ते श्रीनगर हा रेल्वे मार्ग तयार करीत आहे, जेणेकरून अवघ्या काही तासांत तुम्ही जम्मूहून काश्मीरमध्ये पोहोचू शकाल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे (USBRL) काम डिसेंबर २०२३ किंवा जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यानंतर वंदे भारत ट्रेनही जम्मू ते श्रीनगर अशी धावणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी केला प्रवास

या प्रकल्पातील सर्वात कठीण काम म्हणजे चिनाब नदीवर रेल्वे पूल बांधणे. खरं तर हा पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे आणि जगातील सर्वात उंच रेल्वे पूलदेखील आहे. त्याची उंची सुमारे ३५९ मीटर आहे, तर आयफेल टॉवरची एकूण उंची ३३० मीटर आहे. पुलाची पाहणी करण्यापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी पूजाही केली आणि ट्रॉलीत बसून पूल पार केला. अभियंत्यांना जम्मूमध्ये विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे. चिनाब पुलावर ट्रॅक बनवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता विद्युतीकरण आणि धडकविरोधी सुरक्षा उपकरण म्हणजेच कवच बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

काश्मीरमध्ये वंदे भारत धावणार

अश्विनी वैष्णव म्हणाले की, काश्मीर खोऱ्यातील बडगाम येथे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या देखभालीची व्यवस्था केली जाईल. या रेल्वे लिंकचे काम पूर्ण होताच या ट्रॅकवरून वंदे भारत ट्रेन धावण्यास सुरुवात होईल. चिनाबवरील पूल अर्ध्या फुटबॉल मैदानासारखा आहे आणि ही अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे हा पूल अत्यंत सक्रिय भूकंप क्षेत्रात बांधण्यात आला आहे, याचा अर्थ येथे भूकंपाचा खूप मोठा धोका आहे. त्यामुळेच २८ हजार टन स्टीलचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे. त्याची एकूण किंमत सुमारे १,४८६ कोटी रुपये झाली आहे.

चिनाब ब्रिज इतका खास का आहे?

या पुलाची उंची सुमारे ३५९ मीटर आहे, तर एकूण लांबी १,३१५ मीटर आहे. हा पूल १७ स्पॅनवर म्हणजेच खांबांवर उभा आहे, ज्यामध्ये मुख्य स्पॅन ४६० मीटर उंच आहे. पुलाचे सरासरी वय १२० वर्षे आहे आणि तो २६६ किमी वेगाने वाहणारा वारा देखील सहन करू शकतो. या पुलावरून १०० किमी वेगाने ट्रेन धावू शकते.

जम्मू ते श्रीनगर अंतर ३.५ तासात

काश्मीर खोरे देशाच्या उर्वरित भागाशी रेल्वेने जोडले गेल्यावर जम्मूहून येथे पोहोचणे सोपे आणि जलद होईल, असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. या रेल्वे लिंकद्वारे जम्मू ते काश्मीर अवघ्या ३.५ तासांत पोहोचता येते. एवढेच नाही तर काश्मीरमधून सफरचंद आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूकही खूप सोपी होणार आहे. चिनाब पुलाजवळील पर्यटन स्थळे विकसित करण्याचे कामही सुरू आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 13:27 IST

संबंधित बातम्या