विकास एम सचदेवा
VDA crypto investment mistakes India :
गुंतवणुकीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर उपलब्ध असलेले नवनवीन आर्थिक प्रकार सध्या गुंतवणूकदारांना उत्सुकता आणि अतिआत्मविश्वासाच्या बळावर स्वतःकडे आकर्षित करत आहेत. भारतातील आभासी डिजिटल मालमत्ता (VDA) याला अपवाद ठरलेल्या नाहीत. अनेक गुंतवणूकदार विविध तांत्रिक प्लॅटफॉर्म्स अगदी सहजतेने वापरून, पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या आणि थेट मार्गाने गुंतवणूक करत आहेत.

परंतु, तंत्रज्ञानाची ओळख असणे म्हणजे जोखीम माहीत असणे असे अजिबात नाही. नवीन गुंतवणूकदार ब्लॉकचेन तंत्रज्ञान न समजण्यापेक्षा मूलभूत आर्थिक शिस्त न पाळणे, सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे आणि आपण कोणाशी व्यवहार करत आहोत याची माहिती नसणे या कारणांशी संबंधित चुका अधिक करतात. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खालील पाच चुका टाळणे अत्यंत फायदेशीर ठरते.

१. केवळ ‘वापरायला सोपे’ म्हणून प्लॅटफॉर्मची निवड करणे

  • सुंदर दिसणारे ॲप, उपलब्ध असलेल्या डिजिटल मालमत्तांचा विस्तार किंवा आकर्षक जाहिरातीला भुलून सोयीस्करपणा हा प्लॅटफॉर्म निवडण्याचा पहिला निकष असायला नको. खाते उघडण्यापूर्वी गुंतवणूकदाराने हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोण चालवत आहे आणि ते कोणत्या कायदेशीर चौकटीत काम करते, हा प्रश्न विचारला पाहिजे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी, संबंधित VDA सेवा देणारी कंपनी ‘फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट-इंडिया’ (FIU-IND) कडे नोंदणीकृत आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.
  • या नोंदणीमुळे ती संस्था ‘मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा’ आणि दहशतवादाला मिळणारा आर्थिक पुरवठा रोखणाऱ्या कायदेशीर चौकटीत येते. यामुळे जोखीम पूर्णपणे संपत नसली तरी, संस्थेभोवती आणि व्यवहारांभोवती एक कायदेशीर चौकट गुंफली जाते. एखादा प्लॅटफॉर्म वापरण्यापूर्वी ते आकारत असलेल्या शुल्काबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

२. कर भरण्याची वेळ आल्यावरच हिशेब करणे

  • नवीन गुंतवणूकदार सहसा कराबद्दल सर्वात शेवटी विचार करतात.
  • आर्थिक वर्ष संपेपर्यंत खरेदी, विक्री आणि हस्तांतरणासारख्या व्यवहारांचा डोंगर तयार होतो आणि नंतर त्यांचा हिशेब लावणे कठीण होऊन बसते.
  • भारतात आभासी डिजिटल मालमत्तेच्या उत्पन्नाला विशिष्ट कर चौकट लागू असून, त्यात कराचा दर आणि उदगम कर कपात (TDS) यांचा समावेश आहे.
  • पहिल्या दिवसापासून काय खरेदी केले, कधी खरेदी केले, किती रक्कम गुंतवली आणि कधी विकले या व्यवहारांच्या बारीकसारीक नोंदी जपून ठेवा. गुंतवणूक प्रक्रियेचा भाग म्हणून सुरुवातीपासूनच कागदपत्रे सांभाळल्यास कर नियम पाळणे सोपे जाते.

३. सुरक्षेची जबाबदारी दुसऱ्याचीच असल्याचे मानणे

  • तंत्रज्ञान प्रगत असले तरी, सुरक्षेबाबत केल्या जाणाऱ्या मूलभूत चुका अगदी साध्या असतात.
  • सोपा पासवर्ड वापरणे, टू-फॅक्टर ऑथेंटीकेशनकडे दुर्लक्ष करणे, लॉगिन तपशील शेअर करणे किंवा रिकव्हरी माहिती निष्काळजीपणे ठेवणे यांमुळे नियंत्रण गमावण्याचा धोका असतो.
  • जेव्हा वॉलेटवर पूर्ण नियंत्रण तुमचे असते, तेव्हा पासवर्ड विसरल्यास बँकेसारखा तो सहज रिसेट करता येत नाही. यात तुम्ही तुमची डिजिटल मालमत्ता कायमची गमावू शकता.
  • यासाठी तंत्रज्ञानाचे दिग्गज होण्याची गरज नाही; आपले पासवर्ड सुरक्षित ठेवा, सुरक्षित ऑथेंटीकेशन वापरा, रिकव्हरी माहिती इंटरनेटविना (ऑफलाईन) जतन करा आणि ‘प्रायव्हेट की’ चुकूनही कोणासोबत शेअर करू नका.

४. सहज परताव्याचे वचन देणाऱ्यांवर चटकन विश्वास ठेवणे

  • प्रत्येक बाजारात ‘हमीशीर परतावा’, ‘जवळजवळ कोणतीही जोखीम नाही’ किंवा ‘किंमत वाढण्यापूर्वी आताच खरेदी करा’ अशी स्वप्ने दाखवणारे मेसेज दररोज येत असतात.
  • सोशल मीडियामुळे अनोळखी व्यक्ती, इन्फ्लुएन्सर्स किंवा स्वतःला तज्ज्ञ म्हणवणाऱ्या लोकांकडून असे मेसेज वेगाने पसरतात.
  • जेव्हा कोणतीही मालमत्ता ‘खात्रीशीर संधी’ म्हणून समोर आणली जाते, तेव्हा नवीन गुंतवणूकदारांनी घाई करू नये. एखाद्याचे मत हा ‘सल्ला’ मानू नका किंवा त्यांच्या अतिआत्मविश्वासाला नफ्याची हमी समजू नका.
  • कृती करण्यापूर्वी स्वतःला विचारा: मी काय खरेदी करत आहे? यात काय जोखीम आहे? शिफारस करणारी व्यक्ती कोण आहे? आणि मूल्य कमी झाले तर काय होईल?.

५. संकटाचा सामना करू शकणार नाही, एवढी मोठी रक्कम गुंतवणे

  • कोणत्याही बाजारात अस्थिरता असतेच, आणि आभासी डिजिटल मालमत्तेच्या किमती तर अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात.
  • चुकून अस्थिर मालमत्तेत गुंतवणूक करणे ही चूक नसते, पण बाजारात घसरण झाल्यावर जी रक्कम सांभाळणे भावनिक व आर्थिकदृष्ट्या कठीण होते, तेवढी मोठी रक्कम गुंतवणे ही मोठी चूक असते.
  • ज्याला नुकसान सोसता येईल त्याच्यासाठी २०-३०% घसरण वेगळी असते, पण पुढच्या महिन्यातच पैशांची गरज असणाऱ्या व्यक्तीला हा मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का ठरू शकतो.
  • अल्पकालीन चढ-उतारांचा परिणाम तुमच्या दीर्घकालीन निर्णयांवर होऊ देऊ नका आणि आपल्याला नक्की किती गुंतवणूक करायची आहे, हे बाजाराने परीक्षा घेण्यापूर्वीच ठरवा.

थोडक्यात पण महत्त्वाचे

तंत्रज्ञान गोष्टी सोप्या करू शकते, पण ते तुमच्या वतीने गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. भारतात आभासी डिजिटल मालमत्तेचे नियम बदलत असले तरी, मूलभूत नियम तेच आहेत. नवीन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी सखोल अभ्यास करावा, प्लॅटफॉर्मची FIU-IND नोंदणी तपासावी, सुरुवातीपासूनच नोंदी ठेवाव्यात, खात्याची सुरक्षितता पाळावी आणि केवळ मोठ्या चढ-उतारांचा सामना करू शकेल एवढीच रक्कम गुंतवावी.
लेखक बिटडेल्टा इंडियाते मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत.