मुंबई : वेदांता लिमिटेडच्या बहुप्रतिक्षित विलीनीकरण आणि विभाजनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. कंपनीचे विभाजन होऊन तयार झालेल्या ४ नवीन उपकंपन्या सोमवारी, १५ जून २०२६ रोजी शेअर बाजारावर (बीएसई आणि एनएसई) सूचिबद्ध होणार आहेत. बीएसई आणि एनएसईने ११ जून रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या घडामोडींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत
बाजारात सूचिबद्ध होणाऱ्या ४ नवीन कंपन्या
वेदांताच्या शेअरधारकांना १:१ या प्रमाणात (म्हणजेच प्रत्येक १ वेदांताच्या शेअरमागे खालील ४ कंपन्यांचा प्रत्येकी १ शेअर) शेअर मिळाले आहेत:
वेदांता ऑइल अँड गॅस लिमिटेड (पूर्वीचे नाव: माल्को एनर्जी लिमिटेड)
वेदांता पॉवर लिमिटेड (पूर्वीचे नाव: तलवंडी साबो पॉवर लिमिटेड)
वेदांता ॲल्युमिनियम मेटल लिमिटेड
वेदांता आयर्न अँड स्टील लिमिटेड
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे नियम (टीटूटी सेगमेंट)
इंट्राडे ट्रेडिंगवर बंदी: सूचिबद्धतेच्या अर्थात लिस्टिंगच्या पहिल्या १० ट्रेडिंग सत्रांसाठी या चारही नवीन जन्मास आलेल्या कंपन्यांचे शेअर ट्रेड टू ट्रेड (Trade-for-Trade -T2T) सेगमेंटमध्ये ठेवले जातील. याचा अर्थ असा की गुंतवणूकदार यामध्ये फक्त डिलिव्हरी-बेस्ड ट्रेड्स करू शकतील. यामध्ये ‘इंट्राडे ट्रेडिंग’ किंवा ‘आज खरेदी करून उद्या विकणे’ (बीटीएसटी) करता येणार नाही. नवीन शेअर्सच्या लिस्टिंगच्या वेळी बाजारात होणारी प्रचंड अस्थिरता आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी तसेच शेअर्सची खरी किंमत योग्य प्रकारे ठरवण्यासाठी एक्सचेंजकडून हा नियम लागू केला जातो.
स्पेशल प्री-ओपन सेशन
बीएसईने दिलेल्या माहितीनुसार, लिस्टिंगच्या दिवशी (१५ जून) नियमित ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी या शेअर्ससाठी “IPO and Other” श्रेणीअंतर्गत एक विशेष ‘प्री-ओपन सेशन’ आयोजित केले जाईल. यामुळे शेअर्सची सुरुवातीची किंमत अचूकपणे ठरवण्यास मदत होईल.
विभाजनानंतर मूळ ‘वेदांता लिमिटेड’कडे काय राहणार?
३० एप्रिल २०२६ पासून वेदांताचा शेअर आधीच विभाजनाशिवाय म्हणजे एक्सडीमर्जर ट्रेड करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर वेदांता समूहामध्ये एकूण ५ स्वतंत्र कंपन्या असतील. चार कंपन्या वेगळ्या झाल्यानंतर, मूळ वेदांता लिमिटेडकडे खालील महत्त्वाचे व्यवसाय राहतील:
हिंदुस्थान झिंक लिमिटेडमधील हिस्सेदारी.
झिंक इंटरनॅशनल ऑपरेशन्स.
तांबे आणि फेरोक्रोम व्यवसाय.
निकेल आणि इतर महत्त्वपूर्ण खनिजांचे आणि स्ट्रॅटेजिक मेटल्सचे पोर्टफोलिओ.
या विभाजनानंतर मूळ वेदांता लिमिटेड ही प्रामुख्याने ‘क्रिटिकल मिनरल्स आणि स्ट्रॅटेजिक मेटल्स’वर लक्ष केंद्रित करणारी कंपनी म्हणून ओळखली जाईल.
