Vedanta Limited manganese mining block : देशातील अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल यांची मायनिंग आणि धातू उत्पादक कंपनी ‘वेदान्त लिमिटेड’ने मोठा डाव जिंकला आहे. कंपनीने आंध्र प्रदेशातील एका अत्यंत महत्त्वाच्या खाण प्रकल्पाची बोली जिंकली आहे. वेदान्त लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कंपनीला आंध्र प्रदेशातील ‘पुन्नम मँगनीज ब्लॉक’साठी यशस्वी बोलीदाता म्हणून घोषित करण्यात आले आहे. या मोठ्या प्रकल्पाने वेदान्तचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे.

ही लिलाव प्रक्रिया आंध्र प्रदेश सरकारच्या खाण आणि भूविज्ञान विभागाद्वारे ई-लिलावाच्या (E-auction) माध्यमातून पार पडली. सर्व आवश्यक वैधानिक व कायदेशीर प्रक्रियांनंतर वेदांत लिमिटेडच्या नावावर या ब्लॉकची अधिकृत मोहर उमटली आहे.

१५२ हेक्टरमध्ये खाणकाम करण्याची परवानगी

वेदान्त लिमिटेडला मिळालेली मँगनीज खाण आंध्र प्रदेशात असून तब्बल १५२ हेक्टर क्षेत्रात पसरलेली आहे. सध्या हा प्रकल्प शोध मोहिमेच्या ‘G4’ टप्प्यात आहे. G4 टप्पा हा खनिजांच्या शोधाचा पहिला आणि सुरुवातीचा प्राथमिक टप्पा असतो. यामध्ये उपग्रहावरून घेतलेली छायाचित्रे, भूवैज्ञानिक नकाशे आणि हवाई सर्वेक्षणाचा वापर करून मोठ्या क्षेत्रातील खनिज संपत्तीचा अंदाज घेतला जातो.

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी का महत्त्वाचे?

या नवीन मँगनीज ब्लॉकच्या अधिग्रहणामुळे मायनिंग क्षेत्रातील वेदान्त लिमिटेडचे वर्चस्व आणखी मजबूत होणार आहे. पण, यापेक्षा जास्त फायदा देशाची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्राला होणार आहे. भारत सध्या मोठ्या प्रमाणात मँगनीज परदेशातून आयात करतो. देशांतर्गत उत्पादन वाढल्यास भारताचे परकीय चलनावर आधारित आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

वेदांता लिमिटेडचा शेअर

वेदांता लिमिटेडच्या शेअरचा भाव २७१.१० रुपयांवर आज बंद झाला. आज शेअरमध्ये १.३३ टक्के घसरण नोंदवली गेली. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३६० रुपये तर आणि नीचांक १५७.१७ रुपये इतका आहे. कंपनीचे बाजार भांडवल सुमारे १,०६,०११ कोटी रुपये आहे. गुंतवणुकीचा विचार केला तर गेल्या वर्षभरात शेअरने नकारात्मक परतावा दिला आहे. वर्षात शेअरमध्ये जवळपास ४० टक्के घसरण झाली आहे. आता या नवीन प्रकल्पाचा शेअर बाजारावर काय परिणाम होतो? ते सोमवारीच पाहायला मिळेल.