वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सरलेल्या जुलै महिन्यात घरगुती शाकाहारी थाळीच्या खर्चात मासिक तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली आणि तो सात महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. टोमॅटोचे दर कमी झाल्याचा दिलासा असला तरी, कांद्याच्या दरातील मोठी वाढ, तसेच स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेल महागल्याचा परिणाम मोठा ठरला आहे. शाकाहारी थाळीसाठी येणारा सरासरी खर्च जूनमधील २८.४ रुपयांवरून, जुलैमध्ये २९.१ रुपयांपर्यंत वाढला. ही पातळी यापूर्वी डिसेंबर २०२५ मध्ये दिसून आली होती. वार्षिक आधारावर, हा खर्च वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी अधिक आहे. दुसरीकडे, मांसाहारी थाळीचा खर्च मासिक आधारावर ५८.३ रुपयांवर स्थिर राहिला, परंतु वार्षिक अर्थात जुलै २०२५ च्या तुलनेत तो ९ टक्क्यांनी अधिक राहिला.

मासिक वाढीमागे कांद्याच्या दरातील वाढ हे मुख्य कारण होते. जूनच्या तुलनेत कांद्याचे दर २३ टक्क्यांनी वधारले. या महिन्यात बटाट्याचे दरही ४ टक्क्यांनी वाढले. जरी टोमॅटोचे दर १ टक्क्याने कमी झाले आणि इतर बहुतेक घटकांचे दर बऱ्याच अंशी स्थिर राहिले असले, तरी कडाडलेल्या कांद्यामुळे वाढलेल्या आहार खर्चाची भरपाई करण्यासाठी ही घट अपुरी ठरली.

मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्र आणि इतर भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे आणि साठवणुकीतील मालाचे नुकसान झाल्याने पुरवठा मर्यादित झाला. ज्यामुळे वार्षिक आधारावर कांद्याचे दर २० टक्क्यांनी वाढले. रब्बी हंगामातील अधिक दराचा साठवलेला कांदा बाजारात आला. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे पुरवठ्यातील व्यत्यय आणि ऊर्जेचे वाढलेले दर यांचा परिणाम म्हणून खाद्यतेलाचे दर ११ टक्क्यांनी आणि एलपीजी सिलिंडरचे दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढले.

भाज्यांच्या दरातील घटीमुळे थाळीच्या खर्चातील वाढ काही प्रमाणात मर्यादित झाली. लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने रब्बी हंगामातील उत्पादन अधिक झाल्यामुळे बटाट्याचे दर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झाले. त्याच वेळी, लागवड उशिरा झाल्यामुळे पुरवठा चक्र बदलले आणि जुलैमध्ये बाजारात आवक वाढलेल्या टोमॅटोचे दर २ टक्क्यांनी घसरले.

मांसाहार करणाऱ्या कुटुंबांसाठी जेवणाच्या खर्चातील वार्षिक वाढ अधिक तीव्र होती. कारण मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चात साधारणपणे अर्धा वाटा असलेल्या ब्रॉयलर चिकनच्या दरात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. पशुखाद्याचे वाढलेले दर आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये असलेला श्रावण महिना या वर्षी ऑगस्टमध्ये आल्यामुळे निर्माण झालेला तुलनात्मक आधारभूत परिणामातून चिकनच्या दरांना आधार मिळाला. तथापि, मागणीत काहीशी घट झाल्यामुळे मासिक आधारावर ब्रॉयलरचे दर अंदाजे २ टक्क्यांनी कमी झाले, ज्यामुळे मांसाहारी थाळीच्या खर्चात कोणताही बदल झाला नाही.

थाळीचे मूल्य कसे मोजले जाते?

‘क्रिसिल’चा मासिक ‘रोटी-राईस रेट’ हा निर्देशांक उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील तृणधान्ये, कडधान्ये, भाज्या, खाद्यतेल, ब्रॉयलर चिकन आणि एलपीजी यांच्या किमतींचा आधार घेऊन, घरी थाळी तयार करण्याचा खर्च मोजतो. हा निर्देशांक घरगुती स्तरावरील अन्नधान्य महागाईचा एक निदर्शक मानला जातो.