पीटीआय, नवी दिल्ली: स्वित्झर्लंडस्थित जगातील सर्वात मोठी जहाजवाहतूक आणि लॉजिस्टिक्स कंपनी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी (एमएससी) अदानी समूहाच्या केरळमधील विझिंजम बंदरात सुमारे १.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून ४९ टक्के हिस्सा संपादन करेल, अशी माहिती अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने मंगळवारी दिली.
एमएससी ही खरेदी आपल्या ‘टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ या उपकंपनीद्वारे करणार आहे. या करारानुसार, टर्मिनल इन्व्हेस्टमेंटने १.३९७ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल. या व्यवहारामुळे विझिंजम बंदराचे एकूण मूल्यांकन २.८५ अब्ज डॉलरवर (सुमारे २७,००० कोटी) पोहोचले आहे. उर्वरित ५१ टक्के हिस्सा अदानी समूहाकडेच राहणार असल्याने बंदराचे नियंत्रण त्यांच्याकडेच कायम असेल.
हा धोरणात्मक सहयोग भारतीय बंदरांच्या पायाभूत सुविधांमधील आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी खासगी गुंतवणूक आहे. तसेच, यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात विझिंजम बंदर हे एक प्रमुख ‘ट्रान्सशिपमेंट गेटवे’ (माल हस्तांतरण केंद्र) म्हणून उदयास येण्यास बळकटी मिळेल, असे अदानी समूहाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अदानी समूह आणि एमएससी समूह यांच्यात एक निश्चित करार झाला आहे. या करारानुसार, एमएससी समूह कंटेनर टर्मिनल चालवणारी आणि गुंतवणूक करणारी उपकंपनी ‘टर्मिनल इन्व्हेस्टमेंट’ द्वारे ‘अदानी विझिंजम पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (एव्हीपीपीएल) ४९ टक्के हिस्सा घेण्यासाठी गुंतवणूक करेल. एव्हीपीपीएल ही विझिंजम बंदराची विकासक आणि संचालक कंपनी आहे.
या धोरणात्मक सहयोगामुळे मालाच्या (कार्गो) प्रमाणात वाढ आणि कामकाजाला वेग येणार आहे. हे फायदे अतिरिक्त कार्गो आणि बांगलादेशच्या कार्गोमधील वाढीव वाटा यामुळे मिळतील; बांगलादेशचा हा कार्गो सध्या प्रामुख्याने आग्नेय आशियातील प्रतिस्पर्धी ट्रान्सशिपमेंट केंद्रांवर अवलंबून आहे.
यामुळे पूर्व आफ्रिकेतील व्यापार मार्गांवर अदानी समूहाची उपस्थिती मजबूत होईल आणि ‘रिले कार्गो’च्या (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित होणाऱ्या मालाच्या) प्रमाणात वाढ होईल.
जागतिक व्यापारात विझिंजमचे वाढते महत्त्व
विझिंजम हे भारताचे पहिले ‘डीप-ड्राफ्ट मेगा ट्रान्सशिपमेंट पोर्ट’ (खोल पाण्याचे कंटेनर अदलाबदल केंद्र) आहे, जे डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाले होते. आंतरराष्ट्रीय पूर्व-पश्चिम सागरी व्यापारी मार्गापासून हे बंदर अवघ्या १० सागरी मैल अंतरावर असल्याने याला प्रचंड भौगोलिक महत्त्व आहे. जागतिक वाहतुकीत मोठ्या जहाजांमधून आलेला माल या बंदरावर उतरवला जातो आणि तिथून तो छोट्या जहाजांद्वारे इतर देशांत किंवा देशांतर्गत बंदरांवर पाठवला जातो. दुबई किंवा सिंगापूरची बंदरे याच धर्तीवर चालतात.
