Vodafone Idea AGR Relief Package Approval: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये बुधवार, ३१ डिसेंबर रोजी मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. ट्रेडिंग दरम्यान हा शेअर त्याच्या इंट्राडे उच्चांकावरून जवळपास २० टक्क्यांनी घसरला होता. मात्र, बाजार बंद होताना शेअर सावरला आणि ११.५३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

पीटीआय वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने व्होडाफोन आयडियासाठी एजीआर (Adjusted Gross Revenue) मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. या पॅकेजमध्ये एजीआर थकबाकीवर पाच वर्षांची स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे कंपनीला रोखीच्या दबावातून तात्काळ दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

एजीआर (Adjusted Gross Revenue) म्हणजे कंपनीचा एकूण महसूल असतो, ज्या आधारे सरकार परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम शुल्क आकारते. केंद्र सरकारने दूरसंचार कंपन्यांसाठी तयार केलेल्या आर्थिक मदत किंवा सवलत योजनेला एजीआर पॅकेज म्हणतात. या पॅकेजअंतर्गत कंपन्यांना त्यांची थकबाकी भरण्यासाठी सवलती, हप्ते किंवा मुदतवाढ दिली जाते.

मदत उपाययोजनांचा एक भाग म्हणून, व्होडाफोन आयडियाची एकूण ८७,६९५ कोटी रुपयांची एजीआर थकबाकी सध्या गोठवण्यात आली आहे. यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०३२ ते आर्थिक वर्ष २०४१ या कालावधीत ८७,६९५ कोटी रुपयांच्या गोठवलेल्या एजीआर थकबाकी पुन्हा निश्चित केली जाईल. तसेच, ऑडिट अहवालांच्या आधारे दूरसंचार विभागाकडून या थकबाकीचे पुनर्मूल्यांकन केले जाईल. मात्र, व्होडाफोन आयडियाला २०१७-१८ आणि २०१८-१९ या आर्थिक वर्षांशी संबंधित एजीआर थकबाकी २०२५-२६ ते २०३०-३१ या आर्थिक वर्षांदरम्यान कोणताही बदल न करता भरावी लागणार आहे.

व्होडाफोन आयडियाने सरकारला देय असलेल्या एजीआर थकबाकीपैकी १८,००० कोटी रुपयांचे वार्षिक हप्ते मार्च २०२६ पासून सुरू होणार होते. मात्र, कंपनीने एजीआरच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कंपनीचे म्हणणे होते की, जर या देयकांमध्ये दिलासा मिळाला नाही, तर त्यांच्या आर्थिक स्थिरतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि कंपनीतील सरकारच्या हिस्सेदारीलाही धोका निर्माण होऊ शकतो.

ही बातमी समोर आल्यानंतर कंपनीचे शेअर्स अचानक २० टक्क्यांनी घसरले होते. मात्र, बाजार बंद होताना ते सावरले आणि बीएसईवर ११.५३ टक्क्यांच्या घसरणीसह १०.६७ रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स आज १२.१४ रुपयांवर उघडले होते. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२.८० रुपये असून नीचांक ६.१२ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप १,१६,३६०.४२ कोटी रुपये आहे.