Waaree Energies Shares Fall 15 Percent After US Solar Countervailing Duties: अमेरिकेने भारत, इंडोनेशिया आणि लाओस येथून आयात होणाऱ्या सोलर सेल आणि पॅनल्सवर १२५.८७ टक्के काउंटरव्हेलिंग ड्युटी (प्रतिसंतुलन शुल्क) लादली आहे. यामुळे (बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी) वारी एनर्जीज लिमिटेड, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड आणि इतर सौर ऊर्जा उपकरण कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्सर परिणाम?
सकाळी ९:३० वाजेपर्यंत वारी एनर्जीजचे शेअर्स १४.६ टक्क्यांनी घसरून २,५८०.५ रुपयांवर पोहोचले होते. सत्राच्या सुरुवातीला लोअर सर्किट लागल्यानंतर तोटा आणखी वाढला. प्रीमियर एनर्जीजचे शेअर्स १२ टक्क्यांहून अधिक घसरून ६८१.३ रुपयांवर पोहोचले आहेत.
इतर सोलर कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये विक्रम सोलरचे शेअर्स जवळजवळ ७ टक्क्यांनी घसरले, तर वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीजचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक घसरले.
याचबरोबर सोलेक्स एनर्जीचे शेअर्स जवळजवळ ५ टक्क्यांपर्यंत, सात्विक ग्रीन एनर्जीचे शेअर्स जवळजवळ ३ टक्क्यांपर्यंत आणि बोरोसिल रिन्यूएबल्सचे शेअर्स १ टक्क्यांहून अधिक घसरले.
काउंटरवेलिंग ड्युटी म्हणजे काय?
काउंटरवेलिंग ड्युटीचा अर्थ असा आहे की अनुदानाचा (सबसिडीचा) परिणाम संपवण्यासाठी लादलेला अतिरिक्त कर. जेणेकरून देशांतर्गत कंपन्या न्याय्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. हा प्राथमिक कर आहे, म्हणजेच सुरुवातीचा निर्णय आहे. या कंपन्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विक्री करत आहेत की नाही यावर मार्चमध्ये पुढील निर्णय घेतला जाईल.
गेल्या वर्षी २०२५ मध्ये, या तीन देशांमधून अमेरिकेत सौरऊर्जा उपकरणांची आयात अंदाजे ४.५ अब्ज डॉलर्स इतकी होती, जी एकूण आयातीच्या जवळजवळ दोन तृतीयांश होती.
यापूर्वी, अमेरिकेने मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडिया येथून आयात होणाऱ्या सौरऊर्जा उपकरणांवर असेच उच्च शुल्क लादले होते, ज्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि या कंपन्यांना भारत, इंडोनेशिया आणि लाओसमध्ये स्थलांतरित होण्यास भाग पडले.
अमेरिकेने या तीन देशांवर खूप मोठ्या प्रमाणात काउंटरव्हेलिंग ड्युटी लादली आहे. भारतातील सौरऊर्जेवरील एकूण काउंटरव्हेलिंग ड्युटी १२५.८७ टक्के आहे, तर इंडोनेशियासाठी हा दर १०४.३८ टक्के आणि लाओससाठी ८०.६७ टक्के आहे.
यामध्ये काही कंपन्यांसाठीचे काउंटरव्हेलिंग ड्युटीचे दर देखील वेगवेगळे आहेत, जसे की भारतातील मुंद्रा सोलरसाठी १२५.८७ टक्के, इंडोनेशियातील पीटी ब्लू स्काय सोलरसाठी १४३.३ टक्के, पीटी आरईसी सोलर एनर्जीसाठी ८५.९९ टक्के आणि लाओसमधील सोलरस्पेस टेक्नॉलॉजी आणि व्हिएतनाम सनर्जीसाठी ८०.६७ टक्के.

