मुंबई : जगभरातील गुंतवणूकदार आजही दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या गुंतवणुकीच्या मंत्रांचे आणि सल्ल्यांचे तंतोतंत पालन करतात. मात्र, या अब्जाधीश गुंतवणूकदाराची साधी आणि काटकसरी जीवनशैलीही नेहमीच चर्चेत असते. ‘ओरॅकल ऑफ ओमाहा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बफे यांनी नुकतीच आपल्या ‘बर्कशायर हॅथवे’ (Berkshire Hathaway) या कंपनीच्या नेतृत्वाची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवली असली, तरी बफे यांचा वारसा आणि त्यांचे विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील.

बफे यांच्या जीवनशैलीतून प्रत्येक गुंतवणूकदाराने शिकण्यासारख्या चार महत्त्वाच्या गोष्टी…

१. दिखाव्यापेक्षा मूल्याला प्राधान्य

वॉरेन बफे आजही १९५८ मध्ये ३१,५०० डॉलरना खरेदी केलेल्या ओमाहा येथील घरात राहतात. त्या पाच बेडरूमच्या घराची किंमत आता सुमारे १.३ दशलक्ष डॉलर (सुमारे १०.८ कोटी रुपये) इतकी आहे. मात्र, त्या घराशी मुलांच्या संगोपनाच्या आठवणी जोडलेल्या असल्याने ते घर बदलण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही. महागड्या गाड्यांचाही त्यांना मोह नाही. ते अजूनही २०१४ मॉडेलची कॅडिलॅक एक्सटीएस वापरतात. गाडीवर गारपिटीचे डाग असतानाही ती बदलण्याची त्यांना गरज वाटत नाही. “नवीन गाडी घेण्यासाठी अर्धा दिवस खर्च करण्यापेक्षा माझा वेळ अधिक मौल्यवान आहे,” असे ते म्हणाले होते.

“एका विशिष्ट मर्यादेनंतर तुमचे राहणीमान आणि त्यावर होणारा खर्च यांचा आनंदाशी काहीही संबंध नसतो. माझ्याकडे ६ ते ८ घरे असती तर माझे आयुष्य अधिक आनंदी झाले नसते, उलट ते गुंतागुंतीचे झाले असते,” असे बफे यांनी २०१४ मधील एका बैठकीत स्पष्ट केले होते.

२. प्रमाणापेक्षा गुणवत्तेला महत्त्व

बफे यांनी १९८९ मध्ये आपल्या भागधारकांना लिहिलेल्या पत्रात एक सुवर्णमंत्र दिला होता, तो म्हणजे— “एखादी सामान्य कंपनी अगदी स्वस्त किमतीत खरेदी करण्यापेक्षा, एखादी उत्तम कंपनी वाजवी किमतीत खरेदी करणे केव्हाही श्रेयस्कर असते.” आजच्या काळात जेव्हा बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळते, तेव्हा गुंतवणूकदार अनेकदा घाबरून वारंवार खरेदी-विक्री करतात. अशा वेळी बफे यांचा हा सल्ला शांत राहून केवळ चांगल्या दर्जाच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण देतो.

३. काटकसरी जीवनशैली हीच खरी श्रीमंती

अफाट संपत्ती असूनही बफे यांचे पाय नेहमी जमिनीवर असतात. याचाच एक किस्सा सांगताना बिल गेट्स यांनी २०१७ मधील एका पत्रात आठवण करून दिली होती की, एकदा हाँगकाँग दौऱ्यावर असताना वॉरेन बफे यांनी बिल गेट्स यांना कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये न नेतात थेट त्यांच्या आवडत्या ‘मॅकडोनाल्ड्स’मध्ये नेले होते. विशेष म्हणजे तिथे बिल भरताना बफे यांनी आपल्या खिशातून डिस्काउंट कूपन्स काढले होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असूनही पैशांची बचत कशी करावी, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

४. वेळेची किंमत ओळखा

बिल गेट्स यांनी लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये बफे यांच्याकडून शिकलेल्या गोष्टींचा उल्लेख केला होता. “प्रत्येकाकडे दिवसाचे फक्त २४ तास असतात आणि वॉरेन बफे यांना त्याची पूर्ण जाणीव आहे. ते निरर्थक बैठकींमध्ये वेळ वाया घालवत नाहीत,” असे गेट्स म्हणाले होते. त्याचवेळी, ज्या लोकांवर त्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी ते नेहमी वेळ देतात. बर्कशायरमधील सल्लागारांना त्यांनी स्वतःचा फोन नंबर दिला असून ते थेट त्यांच्याशी संवाद साधू शकतात. गुंतवणूक म्हणजे केवळ शेअर बाजारातील व्यवहार नव्हे, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीदेखील असते, हे वॉरेन बफे यांच्या जीवनशैलीतून स्पष्ट होते.

(डिस्क्लेमर: तज्ज्ञांनी व्यक्त केलेली मते आणि सुचवलेले सल्ले हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. याच्याशी लोकसत्ताचा काहीही संबंध नाही.)