Wealthy Family Habits For Long Term Success: जेपी मॉर्गन या जगप्रसिद्ध बँक आणि आर्थिक व्यवस्थापन कंपनीने १०० हून अधिक अब्जाधीश कुटुंबांचे सर्वेक्षण केले आहे, ज्यांची एकत्रित संपत्ती ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जेपी मॉर्गनच्या सर्वेक्षणातून या श्रीमंत कुटुंबांच्या अशा काही सवयी समोर आल्या आहेत, ज्यामुळे त्यांची संपत्ती आणि प्रभाव पिढ्यान्पिढ्या अधिक वाढत आहे.
जेपी मॉर्गनच्या सर्वेक्षणानुसार, अतिश्रीमंत कुटुंबांच्या विविध सवयींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली आहे, ती म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबतची जाणीव.
एका अब्जाधीश कुटुंबाच्या प्रमुखाने सांगितले आहे की, “जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट वेळ आहे, पैसा नाही. जसा तुम्ही एक डॉलर कसा खर्च करायचा याचा काळजीपूर्वक विचार करता, तसाच एक तास कसा घालवायचा याचाही तितक्याच काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.”
१. वाचन
जेपी मॉर्गनच्या सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की यशाची सातत्यपूर्ण सवय कोणतीही पदवी नसून, नियमित वाचन आहे. वाचन ज्ञान निर्माण करते आणि दीर्घकालीन विचारशक्तीला समृद्ध करते.
उदाहरणार्थ, बिल गेट्स यांनी अनेकदा सांगितले आहे की पुस्तके त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. एकेकाळी ते वर्षाला सुमारे ५० पुस्तके वाचत असत. त्याचप्रमाणे, वॉरेन बफे दररोजचा बहुतांश वेळ वाचनात घालवतात.
२. व्यायाम
शारीरिक तंदुरुस्ती ही श्रीमंत कुटुंबांची आणखी एक महत्त्वाची सवय आहे. अब्जाधीश कुटुंबे व्यायामाला चैनीची गोष्ट न मानता, ऊर्जा आणि दीर्घकालीन कामगिरी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली एक महत्त्वाची शिस्त मानतात.
३. सातत्य
शिकणे असो, गुंतवणूक असो किंवा कौटुंबिक व्यवस्थापन असो, जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध दिनचर्येवर भर देतात. ते सर्व गोष्टी नियोजनपूर्वक करतात आणि कोणत्याही बाबतीत अतातायीपणा टाळतात.
४. लवकर उठणे
अनेक अब्जाधीश कुटुंबे वेळेचा पुरेपूर वापर करण्यासाठी लवकर उठण्याला प्राधान्य देतात. त्यांच्या मते सकाळची शांत वेळ सर्जनशीलता, धोरणात्मक विचार करण्याची क्षमता आणि उत्पादकता वाढवते.
५. वेळेचे व्यवस्थापन
वेळेचा वापर नेमका कुठे केला पाहिजे याबद्दलची स्पष्टता ही श्रीमंत कुटुंबांची सर्वात महत्त्वाची सवय आहे. अब्जाधीश कुटुंबे दीर्घकालीन प्राधान्यांच्या आधारे निर्णय घेतात. या श्रीमंत कुटुंबांच्या मते, यश हे १०, २० किंवा ५० वर्षांच्या कौटुंबिक ध्येयांशी सुसंगत असलेल्या निर्णयांवर आधारित असते.
