Brian Moynihan On AI Impact On Jobs: ‘बँक ऑफ अमेरिका’चे सीईओ ब्रायन मॉयनिहॅन यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) नोकऱ्या धोक्यात येतील या भीतीबाबत तुलनेने संतुलित भूमिका मांडली आहे. फॉर्च्युनच्या वृत्तानुसार, This is Working या पॉडकास्टमध्ये बोलताना मॉयनिहॅन म्हणाले की एआयमुळे उद्योगांमध्ये बदल होणार असले तरी इतिहास सांगतो की तंत्रज्ञानाच्या लाटा क्वचितच पूर्ण रोजगार नष्ट करतात.

ते पुढे म्हणाले की १९६० च्या दशकात संगणकांमुळे व्यवस्थापक आणि उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या नष्ट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. “१९६९ मध्ये अमेरिकेत ८० दशलक्ष लोक काम करत होते. २०१९ मध्ये ही संख्या १६० दशलक्ष झाली. त्या काळापासून २०१९ पर्यंत अमेरिकेत किती तंत्रज्ञानाचा वापर झाला, याचा विचार करा”, असे त्यांनी सांगितले.

या सर्व दशकांमध्ये अनेकांनी नोकऱ्यांतील कपातीबाबत गंभीर इशारे दिले होते, तरीही ५० वर्षांत रोजगार दुप्पट झाला, असे त्यांनी नमूद केले.

मॉयनिहॅन यांनी यावरही भर दिला की एआयकडे मानवी क्षमतांची वाढ करणारे साधन म्हणून पाहिले पाहिजे, पर्याय म्हणून नाही. त्यांनी सांगितले की बँक ऑफ अमेरिकामध्ये एआयचा वापर आधीपासूनच ट्रेडिंग, ऑडिटिंग आणि कायदेशीर कामांमध्ये केला जात आहे.

“यामुळे काम शिकण्यासाठी लागणारा कालावधी कमी होतो आणि ज्ञान आत्मसात करण्याचा वेग वाढतो. त्यामुळे त्या क्षेत्रातील तसेच आमच्या कंपनीतील इतर सर्व क्षेत्रांतील तरुण किंवा कनिष्ठ सहकाऱ्यांना मदत होते. आणि हो, याचा परिणाम वरिष्ठ कर्मचाऱ्यांवरही होणार आहे”, असे त्यांनी नमूद केले.

मॉयनिहॅन यांची ही एआय बाबतची सकारात्मक भूमिका बँकिंग क्षेत्रातील इतर अधिकाऱ्यांच्या मतांशीही सुसंगत आहे. जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डायमन यांनी म्हटले आहे की, एआयमुळे भविष्यात लोकांना कमी काम करून अधिक काळ, अधिक निरोगी आयुष्य जगणे शक्य होऊ शकते.

मात्र, डायमन यांनी इशाराही दिला की समाजाने नोकऱ्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य कपातीसाठी कौशल्यविकास आणि धोरणात्मक तयारी ठेवली नाही, तर सामाजिक अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, बँकिंग क्षेत्रात एआयचा वापर वेगाने वाढत आहे. एआय प्रतिभा, नवोपक्रम, नेतृत्व आणि पारदर्शकता या बाबतीत बँक ऑफ अमेरिका जागतिक स्तरावर अव्वल १० बँकांमध्ये आहे. या क्षेत्रात जेपी मॉर्गन चेस आघाडीवर असून, त्यानंतर कॅपिटल वन आणि रॉयल बँक ऑफ कॅनडा यांचा क्रमांक लागतो.