बंगळुरू : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पल्लिया यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे ४९.६ कोटी रुपयांचे एकूण मानधन मिळाले. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, हे मानधन मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कमी असले तरी ते कंपनीतील सर्वाधिक वेतन घेणारे कार्यकारी संचालक ठरले आहेत.
मागील आर्थिक वर्षात पल्लिया यांना ५३.६ कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. यंदा त्यांच्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर वेतनात (व्हेरिएबल पे) घट झाल्याने एकूण मानधन कमी झाले. त्यांचे कमिशन आणि कामगिरीआधारित वेतन १४.५ कोटी रुपयांवरून ९.९ कोटी रुपयांपर्यंत घसरले. मात्र वेतन आणि भत्ते १४.६ कोटी रुपयांवरून १५.५ कोटी रुपयांपर्यंत वाढले.
दुसरीकडे, विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांच्या मानधनात मोठी घट झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यांना सुमारे ७.३ कोटी रुपयांचे मानधन मिळाले, जे मागील वर्षातील १३.८ कोटी रुपयांच्या तुलनेत जवळपास ५० टक्क्यांनी कमी आहे. त्यांच्या कमिशन आणि कामगिरीआधारित वेतनात ७ कोटी रुपयांवरून २.२ कोटी रुपयांपर्यंत घट झाल्याने एकूण मानधन कमी झाले.
वार्षिक अहवालानुसार, पल्लिया यांच्या एकूण मानधनामध्ये १५.५ कोटी रुपये वेतन व भत्ते, ९.९ कोटी रुपये कमिशन आणि व्हेरिएबल पे, २३.३ कोटी रुपये अन्य लाभ तसेच सुमारे १ कोटी रुपयांचे स्थगित लाभ (डिफर्ड कॉम्पेन्सेशन) यांचा समावेश आहे. तर प्रेमजी यांच्या मानधनामध्ये ६.३ कोटी रुपये वेतन व भत्ते, २.२ कोटी रुपये कमिशन व व्हेरिएबल पे, अल्प प्रमाणातील अन्य लाभ आणि ०.७ कोटी रुपयांचे स्थगित लाभ यांचा समावेश होता.
कंपनीच्या धोरणानुसार, प्रेमजी आणि पल्लिया यांना मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत विप्रोच्या एकत्रित निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीच्या ०.३५ टक्के इतके कमिशन मिळण्याची तरतूद आहे.
पॅकेजचे संपूर्ण वर्गीकरण
१. श्रीनिवास पल्लिया (CEO):
- एकूण वेतन : ₹४९.६ कोटी (FY25 मध्ये ₹५३.६ कोटी)
- मूळ वेतन व भत्ते : ₹१५.५ कोटी
- कमिशन आणि व्हेरिएबल पे : ₹९.९ कोटी
- इतर भत्ते व लाभ : ₹२३.३ कोटी
- डिफर्ड कॉर्पोरेट बेनिफिट्स : ₹१ कोटी
२. ऋषद प्रेमजी (Executive Chairman)
- एकूण वेतन : ₹७.३ कोटी (FY25 मध्ये ₹१३.८ कोटी)
- मूळ वेतन व भत्ते : ₹६.३ कोटी
- कमिशन आणि व्हेरिएबल पे : ₹२.२ कोटी
- इतर भत्ते : ₹३ लाख
- डिफर्ड कॉर्पोरेट बेनिफिट्स : ₹७० लाख
नफ्याशी जोडलेले कमिशन
विप्रोच्या नियमांनुसार, ऋषद प्रेमजी आणि श्रीनिवास पल्लिया हे दोघेही कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात झालेल्या वाढीवर ०.३५ टक्के कमिशन मिळण्यास पात्र आहेत. यंदा कंपनीच्या निव्वळ नफ्यातील वाढीचा वेग मंदावल्याने दोघांच्याही कमिशनवर थेट परिणाम झाला आहे.
