पीटीआय, नवी दिल्ली
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडच्या संचालक मंडळाने १५,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेची गुरुवारी घोषणा केली. गुरुवारच्या सत्रातील शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीच्या भागधारकांना यातून त्यांच्याकडील समभागावर १९ टक्के लाभ मिळविता येणार आहे. यापूर्वी विप्रोने वर्ष २०२३ मध्ये १२,००० कोटी, २०१६ सालात २,५०० कोटींची, २०१७ सालात ११,००० कोटींची आणि २०२० मध्ये ९,५०० कोटी रुपये अशा योजनांवर खर्च करून भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे.
विप्रोच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या योजनेनुसार, कंपनीकडून सुमारे ६० कोटी समभाग प्रत्येकी २५० रुपये किमतीला खरेदी केले जाणार आहेत. म्हणजेच समभागाच्या गुरुवारच्या बीएसईवरील २१०.२० रुपये बंद भावाच्या तुलनेत १९ टक्के अधिमूल्य भागधारकांना मिळेल. कंपन्यांकडील राखीव गंगाजळीतून भागधारकांना लाभ देण्याचा समभाग पुनर्खरेदी हा एक पर्याय असून, गेल्या काही वर्षांत टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, माइंड ट्री, इन्फोसिस या विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून हा मार्ग समर्पकपणे वापरात आला आहे.
विप्रोकडून मागील काही वर्षांत सलगपणे भागधारकांना या पद्धतीतून लाभ दिला गेला आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार, कोणत्याही कंपनीला समभाग पुनर्खरेदी ही १२ महिन्यांमध्ये एकदाच करता येते. विप्रोने यापूर्वी जून २०२३ मध्ये समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली होती. त्यामुळे या नव्या पुनर्खरेदीचा कंपनीचा मार्ग खुला झाला आहे. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात विप्रो चा समभाग ०.१९ टक्क्यांनी वधारून २१०.२० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २.२० लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.
भागधारकांना लाभाचे दान
| ‘बायबॅक’ वर्ष | २०१६ | २०१७ | २०१९ | २०२१ | २०२३ | २०२६ |
| आकारमान (रु. कोटी) | २,५०० | ११,००० | १०,५०० | ९,५०० | १२,००० | १५,००० |
| प्रति समभाग किंमत (रु.) | ६२५ | ३२० | ३२५ | ४०० | ४४५ | २५० |
| अधिमूल्य % | ४ | १९ | ३३ | – | १९ | १९ |
तिमाहीत ३,०७४ कोटींचा नफा
विप्रोने गुरुवारी मार्च २०२६ अखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत ३,५०१.८ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत १.८ टक्क्यांची किरकोळ घट नोंदवली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ३,५६९.६ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. तर सरलेल्या मार्च तिमाहीत महसूल ७.६ टक्क्यांनी वधारून २४,२३६.३ कोटी रुपये झाला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने १३,१९७.४ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील कंपनीचा एकूण महसूल ३.९६ टक्क्यांनी वाढून ९२,६२४ कोटी रुपयांवर पोहोचला.
समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?
एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.कंपन्या ‘बायबॅक’ का करतात?कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध कार्यांसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्याव्यतिरिक्तदेखील ठरावीक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.
